खूप पाहिली वेदशास्त्रसंपन्न माणसे
धर्म पांघरुन माणसांस सापत्न माणसे
शास्त्रशुद्ध उच्चार मागतो देव कोणता ?
थाप मारती तीर्थक्षेत्रसंलग्न माणसे
देव काय नैवेद्य मागतो सोवळ्यातला ?
खरकट्यातुनी वेचती इथे अन्न माणसे
राउळास आकार येत पाथरवटांमुळे
देवरूप साकारतात प्रच्छन्न माणसे
हार मानुनी अंत, पार शोधून शेवटी
"नेति, नेति" उद्गारतात व्युत्पन्न माणसे
Labels: कविता
बहुसंख्य मात्र येथे केवळ जगून मेले
दे, कायद्या, पुरावा काही जिवंततेचा
चिखलात तारखांच्या लाखो रुतून मेले
रात्री ऋतू-ऋतूने बर्फाळ होत गेल्या
ज्योती, पतंग दोघे मग गारठून मेले
कौतुक करा फुलाच्या ह्या एकनिष्ठतेचे
जे एकदाच फुलले अन् मोहरून मेले
सरणावरी मुमुक्षू वैतागुनी म्हणाला
"यंदाहि फक्त विटके कपडे जळून मेले"
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
उदार झाली अर्थव्यवस्था, कुबेर शासक झाले
कशास सामान्यांची गणती, किती कफल्लक झाले?
पहा, पहा नवश्रीमंताची कितीक नगरे वसली
कुरूप पाले उठली सारी, किती विधायक झाले
महान झाला आहे भारत अशी वदंता आहे
सरस्वतीपूजक सारे, श्री, तुझे उपासक झाले
नव्या पहाटेच्या गप्पाही शिळ्या कधीच्या झाल्या
तशाच सार्या जाती-पाती, किती सुधारक झाले
कशी, कधी गणराज्याची मंडई बनवली आम्ही?
कसे, कधी ह्या नागरिकांचे मुकाट ग्राहक झाले?
कसा विषमतेच्या चित्राला, मिलिंद, उज्ज्वल मानू?
तसे बरे नव्हते आधीही, अता विदारक झाले
Labels: कविता
थकल्यावरती सहज शिराया कूस शोधतो आहे
एकाकी चालुन थकलो, जूलूस शोधतो आहे
गर्दी भाडोत्री मिळते, जयघोष टेप केलेला
सुखसोयींनी युक्त असा मी क्रूस शोधतो आहे
आयुष्याच्या प्रखर उन्हाने रोज काहिली होते
आभासी का होईना, पाऊस शोधतो आहे
प्रेयस, श्रेयस, राजस, तामस - रूप कोणते घ्यावे ?
ज्यात स्वत:ला ओतावे ती मूस शोधतो आहे
मुलगा, भाऊ, नवरा, बाबा, सर्व लेबलांखाली
घुसमटलेला, दडलेला माणूस शोधतो आहे
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
उगा का स्वत:ला सजवले असावे ?
तिला प्रेम माझे उमजले असावे
असे गंध हा कस्तुरी भावनांचा
उराशी तिने पत्र धरले असावे
अचानक नकारातला जोर सरला
कुणी नाव माझे सुचवले असावे
सहज गाजवू लागली हक्क तेव्हा
मनाने तुला खास वरले असावे
कधी ती अबोली, कधी रातराणी
फुलांनीच नखरे शिकवले असावे
अशी ऐन रंगात का लाजली ती ?
दिवे चांदण्यांचे उजळले असावे...
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
जातो तिथे कपाटे उघडून पाहतो मी
ग्रंथांविना घराला शो-रूम मानतो मी
वाटेत माणसाचे माणूसपण हरवले
उत्क्रांतवाद कोठे चुकला, तपासतो मी
बांधून ठेवणारे विरलेत सर्व धागे
तुटलेपणा मनांचा शब्दात ओवतो मी
शिकलो नव्या जगाचे रीती-रिवाज मीही
सोयीनुसार जवळी येतो, दुरावतो मी
हिंदूपणास जपतो, मी संस्कृतीस जपतो
(तोरण सणासुदीला दारास लावतो मी!)
वरदान शारदेचे, की शाप हे कळेना
हरपून भान कागद दिन-रात नासतो मी
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
मधुबाला
मूळ हिंदी कवी : हरिवंशराय ’बच्चन’
मधुप
मूळ हिंदी कविता | भावानुवाद |
१. मधु-प्यास बुझाने आए हम,मधु-प्यास बुझाने हम आए ! पग-पायल की झनकार हुई, पीने को एक पुकार हुई, बस हम दीवानों की टोली चल देने को तैयार हुई, मदिरालय के दरवाज़ों पर आवाज़ लगाने हम आए | मधु-प्यास बुझाने आए हम, मधु-प्यास बुझाने हम आए ! | १. मधु-तृष्णा आलो भागवण्या,मधु-तृष्णा भागवण्या आलो ! झंकार नूपुरांची झाली, पीण्याची अन् आली हाळी, मग आम्हां वेड्यांची टोळी प्रस्थानाला आतुर झाली, मधुशालेच्या दरवाजावर आम्ही धडकी देण्या आलो. मधु-तृष्णा आलो भागवण्या, मधु-तृष्णा भागवण्या आलो ! |
२. हमने छोडी कर की माला,पोथी-पत्रा भू पर डाला, मन्दिर-मस्जिद के बन्दीगृह को तोड, लिया कर में प्याला औ' दुनिया को आज़ादी का सन्देश सुनाने हम आए | मधु-प्यास बुझाने आए हम, मधु-प्यास बुझाने हम आए ! | २. सोडली करातिल जपमाला, फेकले भू-वरी पोथीला, मंदिर-मस्जिद कारा तोडुन घेतला करी आम्ही प्याला अन् दुनियेला स्वातंत्र्याचा संदेश अम्ही देण्या आलो. मधु-तृष्णा आलो भागवण्या, मधु-तृष्णा भागवण्या आलो ! |
| ३. क्रोधी मोमिन हमसे झगड़ा, पंडित ने मंत्रों से जकड़ा, पर हम थे कब रुकनेवाले, जो पथ पकड़ा, वह पथ पकड़ा, पथ-भ्रष्ट जगत को मस्ती की अब राह बताने हम आए | मधु-प्यास बुझाने आए हम, मधु-प्यास बुझाने हम आए ! | ३. क्रोधित मोमिन तंटा करतो,मंत्रात बद्ध पंडित करतो, परि अम्ही न अडतो वा बधतो, जो मार्ग निवडला, आचरतो, पथ-भ्रष्ट जगाला मस्तीचा आता पथ दाखवण्या आलो. मधु-तृष्णा आलो भागवण्या, मधु-तृष्णा भागवण्या आलो ! |
४. छिपकर सब दिन था जग पीता,पीता न अगर कैसे जीता ? जब हम न समझते थे इसको, वह दिन बीता, वह युग बीता; साक़ी से मिल मदिरा पीने अब खुले-खज़ाने हम आए | मधु-प्यास बुझाने आए हम, मधु-प्यास बुझाने हम आए ! | ४. गुपचुप हे जग पीतच होते,त्याविण, सांगा, कैसे जगते ? सरले ते दिन, ते युग सरले, जेव्हा हे मज उमजत नव्हते; साकीसंगे मदिरा पीण्या खजिन्यास खुल्या आता आलो. मधु-तृष्णा आलो भागवण्या, मधु-तृष्णा भागवण्या आलो ! |
५. मग में कितने सागर गहरे,कितने नद-नाले नीर-भरे, कितने सर, निर्झर, स्रोत मिले, पर, नहीं कहीं पर हम ठहरे; तेरे लघु प्याले में ही बस अपनत्व डुबाने हम आए | मधु-प्यास बुझाने आए हम, मधु-प्यास बुझाने हम आए ! | ५. वाटेत खोल सागर आले,किति तुडुंब भरले नद-नाले, किति झरे, स्रोत, निर्झर आले, परि पाय कुठेही ना ठरले; तव छोट्याशा प्याल्यात अम्ही स्वत्वाला विरघळण्या आलो. मधु-तृष्णा आलो भागवण्या, मधु-तृष्णा भागवण्या आलो ! |
६. है ज्ञात हमें नश्वर जीवन,नश्वर इस जगती का क्षण-क्षण, है, किन्तु, अमरता की आशा करती रहती उर में क्रंदन, नश्वरता और अमरता की आशा अब द्वन्द्व मिटाने हम आए | मधु-प्यास बुझाने आए हम, मधु-प्यास बुझाने हम आए ! | ६. जाणतो असे नश्वर जीवन,नश्वर ह्या जगण्याचा क्षण-क्षण, तरीही अमरत्वाची आशा उरि करत राहते आक्रंदन, नश्वरता अन् अमरत्वाच्या द्वंद्वाला संपवण्या आलो. मधु-तृष्णा आलो भागवण्या, मधु-तृष्णा भागवण्या आलो ! |
७. दूरस्थित स्वर्गों की छायासे विश्व गया है बहलाया, हम क्यों उनपर विश्वास करें, जब देख नहीं कोई आया ? अब तो इस पृथ्वी-तल पर ही सुख-स्वर्ग बसाने हम आए | मधु-प्यास बुझाने आए हम, मधु-प्यास बुझाने हम आए ! | ७. दूरिल स्वर्गांच्या स्वप्नांवररमविले जगा आहे इथवर, साक्षात कधी दिसले नाहित, विश्वास कसा ठेवू त्यांवर ? आता इथेच भू-वरती ह्या निर्माण स्वर्ग करण्या आलो ! मधु-तृष्णा आलो भागवण्या, मधु-तृष्णा भागवण्या आलो ! |
८. हम लाए हैं केवल हस्ती,ले, साकी, दे अपनी मस्ती, जीवन का सौदा ख़त्म करें, मिल मुक्ति हमें जाए सस्ती; साकी, तेरे मदिरालय को अब तीर्थ बनाने हम आए | मधु-प्यास बुझाने आए हम, मधु-प्यास बुझाने हम आए ! | ८. घे, साकी, तू जीवन अमुचे,भर रंग त्यात तव मस्तीचे, व्यवहार जीवनाचा करूया, हे स्वस्त दाम अन् मुक्तीचे; साकी, तव मदिरालयास ह्या मी तीर्थक्षेत्र करण्या आलो. मधु-तृष्णा आलो भागवण्या, मधु-तृष्णा भागवण्या आलो ! |
९. चिरजीवी हो साकीबाला !चिर दिवस जिए मधु का प्याला ! जो मस्त हमें करनेवाली, आबाद रहे वह मधुशाला ! इतने दिन जो बदनाम रही, उसका गुण गाने हम आए | मधु-प्यास बुझाने आए हम, मधु-प्यास बुझाने हम आए ! | ९. चिरजीवी हो साकीबाला ! चिरकाल असो मधुचा प्याला ! बेधुंद अम्हाला करणारी वसलेली राहो मधुशाला ! अपकीर्त आजवर ती होती, गुणगान तिचे करण्या आलो. मधु-तृष्णा आलो भागवण्या, मधु-तृष्णा भागवण्या आलो ! |
१०. दी हाथ खुले तूने हाला,हम सबने भी जी-भर ढाला, यह तो अनबूझ पहेली है - क्यों बुझ न सकी अंतर्ज्वाला ? मदिरालय से पीकर के भी क्या प्यासे जाने हम आए ? मधु-प्यास बुझाने आए हम, मधु-प्यास बुझाने हम आए ! | १०. तू मुक्तकरे दिधली हाला,मनसोक्त अम्ही प्यालो प्याला, हे न सुटणारे कोडे की - शांतली न का अंतर्ज्वाला ? मद्यगृहातून पीऊनही का तहानले जाण्या आलो ? मधु-तृष्णा आलो भागवण्या, मधु-तृष्णा भागवण्या आलो ! |
११. कल्पना सुरा औ' साकी है,पीनेवाला एकाकी है, यह भेद हमें जब ज्ञात हुआ, क्या और समझना बाकी है ? जो गाँठ न अब तक सुलझी थी, उसको सुलझाने हम आए | मधु-प्यास बुझाने आए हम, मधु-प्यास बुझाने हम आए ! | ११. भ्रम असे सुरा आणिक साकी,पीणारा असतो एकाकी, मज रहस्य हे कळल्यानंतर, समजण्या काय उरले बाकी ? जी गाठ आजवर ना सुटली, तिजला मी सोडवण्या आलो. मधु-तृष्णा आलो भागवण्या, मधु-तृष्णा भागवण्या आलो ! |
१२. यह सपना भी बस दो पल है,उर की भावुकता का फल है, भोली मानवता चेत, अरे, सब धोखा है, सारा छल है ! हम बिना पिए भी पछ़ताते, पीकर पछ़ताने हम आए | मधु-प्यास बुझाने आए हम, मधु-प्यास बुझाने हम आए ! | १२. हे दोन पळांचे स्वप्न असे,हे भावुकतेचे फलित असे, भोळ्या मानवते, जागी हो, हे सर्व दगा अन् कपट असे ! पस्तावतोच प्यालाविणही, प्राशून खंत करण्या आलो. मधु-तृष्णा आलो भागवण्या, मधु-तृष्णा भागवण्या आलो ! |
Labels: Madhubala, translation, अनुवाद, भाषांतर, मधुबाला


