Blogger Template by Blogcrowds.

शहाणे वागती रीतीप्रमाणे
जिणे आखीव भूमीतीप्रमाणे 

कटाक्षांचे जरी जाळे मुलायम  
चिवटता तांबड्या फीतीप्रमाणे 

लढाईचे नियम आधीच ठरवू
करू संसार रणनीतीप्रमाणे 

दुधाची भागवू ताकावरी, ये
तृषेला भोगही प्रीतीप्रमाणे

दिसो तृप्ती मुखावर पूर्ततेची 
असावी क्लांतता वीतीप्रमाणे

हवा ठेहराव कवितेला भिनाया   
भिडाया चाल खगगीतीप्रमाणे  


 

कल्पना झाल्या शिळ्या, प्रतिमा पुराण्या
झाडते आहे तरी कविता दुगाण्या

भेटतो तो आपल्या दु:खात असतो
ऐकवाव्या मी कुणाला रडकहाण्या

कूस केव्हा बदलली ह्या जीवनाने?
युगुलगीतांच्या कधी झाल्या विराण्या?

युद्धभूमी पाहुनी अवसान गळले
अन्‌ तुतार्‍या कालच्या झाल्या पिपाण्या

हे किती शोकांतिकांचे मूळ असते
एक राजा आणि त्याच्या दोन राण्या 

कुणी वचने विसरला अन्‌ कुणी चळला
तिच्या रूपात जेव्हा मोह अवतरला

तिची वर्दी मला देताच डोळ्यांनी
फुलांचा गालिचा हृदयात अंथरला

इथे नाचीत तालावर तिच्या सारे
तिथे दरबार इंद्राचा सुना पडला

जसे घोंघावते वारे उरी भरले
तसा पदराबरोबर तोल ढासळला

स्वत:वर ठेवता आला न मज ताबा
तिचाही पाय थोडा वाकडा पडला

दिवे मिष्किल उजळले नेमक्या वेळी
तिने अंगावरी संकोच पांघरला



तिला पाहण्याचा लळा लागला
स्वत:हून मासा गळा लागला

नव्हाळीत नाहून शृंगारली
किती देखणा सापळा लागला

नको गर्व, राधे, उजळ कांतिचा
तुलाही निळासावळा लागला

मनाला मृदुल स्पर्श झाला तिचा
झरा प्रीतिचा कातळा लागला

उभय चेहर्‍यांवर प्रभा तृप्तिची
भुकेला तनय आचळा लागला

युगुलगीत आपण जरी छेडले
तुझा सूर का वेगळा लागला?

उसळती नदी मी, निमाले, मिलिंद
तुझा पाय यमुनाजळा लागला

कोण स्वत:चा असतो? सारे गुलाम संबंधांचे

ब्रह्म स्वयंभू, बाकी येथे तमाम संबंधांचे


कूस सवाष्णेची, पण दिसते कपाळ वैधव्याचे

पोर निरागस असुनी ठरते हराम संबंधांचे


रोग दुराव्याचा दोघांच्या मनास जडला असता

दु:खद नात्यावर चोपडतात बाम संबंधांचे


लाभ सहज होतो ज्याचा ते सहज विसरले जाते

मोल करी ना कोणी हल्ली छदाम संबंधांचे


थेट अनादी कालापासून सामने चुरशीचे

स्त्री-पुरुषांच्या मेळाचे, साम-दाम संबंधांचे


यौवन येता वात्सल्याचे, जरेत मग गात्रांचे

'भृंग', जगी चुकले कोणाला विराम संबंधांचे?

आधी थोडी गर्दी जमते, गर्दीचा मग जमाव होतो
दंगे-धोपे होता होता एके दिवशी उठाव होतो

नारेबाजी, राडेबाजी, मारामार्‍या, अंदाधुंदी
जिथे पहावे तिथे क्रांतिचा अखेर हा स्थायिभाव होतो

लढो महात्मे शस्त्रावाचुन, लढो शस्त्रपुत क्रांतीकारी
लढ्यात दोन्ही सामान्यांचा अटळपणे रक्तस्राव होतो

आयोगांवर आयोगांचा रतीब शासन घालत बसते
सभात्याग अन्‌ घोषणांत मग दुर्लक्षाचा ठराव होतो

रोज बातम्या पाहत पाहत हळवेपणही लयास जाते
खून, दरोडे, बळजबरीचाही डोळ्यांना सराव होतो

सांगून झाले खूप, तू नि:शब्द हो, कविते

मौनात बाकी पोचवू, नि:शब्द हो, कविते



केलीस तितकी खूप आहे वाट दु:खांना


वाहून जाऊ देत पू, नि:शब्द हो, कविते



हा अक्षरांचा गोफ केवळ कागदी आहे


ना गंध त्याला, ना मधू, नि:शब्द हो, कविते



होईल सवयीचा पलायनवाद श्रोत्यांना

 
होईल शब्दांची अफू, नि:शब्द हो, कविते



बोलूनही काही बदलणे ज्यांस ना जमते


त्यांचे जगी होते हसू, नि:शब्द हो, कविते



सेवायला बागेत नाही 'भृंग' कोणीही


वाया नको ग मोहरू, नि:शब्द हो, कविते

कर स्पर्श तू दवाचा, खुलते कळी अशाने

फुलतो गुलाब गाली, पडते खळी अशाने 



याचक बनून आलो, वर्षाव कर स्मितांचा 


भरतील मौक्तिकांनी ह्या ओंजळी अशाने 



सुकवीत केस ओले सौधात का उभी तू?

 
निर्दोष माणसांचा जातो बळी अशाने 



रंगात श्रीहरीच्या रंगू नकोस इतकी

  
होशील, गौर राधे, तू सावळी अशाने



समईपरी उशाशी तेवीत दोन डोळे


प्रत्येक रात्र होते दीपावळी अशाने 


संदेश पाठवावे, विरही मना, कितीदा?

  
होईल दूत सारी मेघावळी अशाने 



तिज धुंद सांजकाळी चिडवू नकोस 'भृंगा'

 
एकादशी घडो ना तुज निर्जळी अशाने

रणधुमाळी तीच अन्‌‍ त्याच आरोळ्या पुन्हा

ठाकल्या समरांगणी लुटुपुटू टोळ्या पुन्हा



लाख लाखोल्या जरी एकमेका वाहिल्या


गाठण्या सत्ताशिखर बांधती मोळ्या पुन्हा



धूळ ज्यांची मस्तकी धारली ते मातले


घालवत नाही, मना, स्वप्नरांगोळ्या पुन्हा



राजकारण खेळ हा कुंटणींचा चालला


पुनरपी ढळले पदर, उतरल्या चोळ्या पुन्हा



मोठमोठे मार्ग पण वाटमारी टोलची


रे खिशा, वाटा बर्‍या त्याच चिंचोळ्या पुन्हा



दीन-दुबळे गांजले; आग पोटी पेटली


भाजती नेते, पहा, त्यावरी पोळ्या पुन्हा



नेहमी आश्वासनी अडकतो अलगद अम्ही


आपला देती बळी मक्षिका कोळ्या पुन्हा



कैफ धर्माचा नुरे, ना निधर्माची नशा


ह्यापुढे आणू नका त्या अफूगोळ्या पुन्हा



पाच वर्षे पोटभर खूप लोणी लाटले


जोगव्यासाठी पुढे, 'भृंग', का झोळ्या पुन्हा?

रिक्त हातांची कुणाला खंत आहे?
शब्द धन ज्याचे, खरा श्रीमंत आहे

लोक का भीतात एकाकीपणाला
कोण कोणाचा इथे आद्यंत आहे?

मी तिला ठरवूनही सोडू न शकलो
मी कुठे श्रीराम वा दुष्यंत आहे?

राजकारण खेळ आहे लेबलांचा
कालचा डावा अता सामंत आहे

पक्षही ओवाळला आहे तुझ्यावर
सांग, खुर्चे, कोण निष्ठावंत आहे?

उभयतांचा कोंडमारा होत आहे
अप्सरेच्या सोबतीला संत आहे

गाठ मरणाशी, स्मशानाशीच कायम
भूत ना वेताळ, तो किरवंत आहे

काय चुकले, पूजले जर मी स्वत:ला
'भृंग', सर्वांच्यात जर भगवंत आहे?

Older Posts