कोण आपणहून आले, आणले गेले किती ?
काय कोणाला इथे, जगले किती, मेले किती
दंग रसपानात जे त्यांना कुठे कळले कधी ?
उमलण्याआधी इथे कोमेजले झेले किती
जी शिळा होऊन पडली तीच केवळ जाणते
स्पर्श कुठला पतित-पावन, मोह जडलेले किती
वस्त्र अतिथीचे टिपे निशिगंध वस्तीची नजर
लाज कोणी सोडली, संकोच ल्यालेले किती
द्वैत-अद्वैतात जेव्हा रंगतो कलगी-तुरा
पावती तादात्म्य मग शालू किती, शेले किती
तोबरा भरुनी मतांचा पिंक जो तो टाकतो
लावुनी जातो चुना; असले इथे ठेले किती?
अमृताचे थेंब थोडे देउनी गेलीस तू
दाखवू, साकी, कसे हृदयी रिते पेले किती?
कैक स्वामी अन् बुवा, बापू नि श्री श्री पाहिले
धर्म जगलेले किती अन् फक्त पढलेले किती...?
बोलणे, भृंगा, असे पूर्वी रुदन रानातले
लाभले संन्यास घेता भक्तगण, चेले किती !
काळजात आठवण फुलापरी जपायची
गंध देउनी जगास, सल उरी जपायची
आणखी कुणी करेल का जतन तुझ्यापरी ?
तूच, काळजा, तुझ्यातली सुरी जपायची
एव्हढे जवळ असूनही किती दुरावलो
सात पावलांतली अता दरी जपायची
मंदिरी मनातल्या तिला असे पुजायचे
प्रीतिची न कबर संगमरमरी जपायची
शोभलो तुला न मी, मला न लाभलीस तू
जन्म घेउनी नवा बरोबरी जपायची
बाण अंगठ्यातला, मिलिंद, सूर गोठवी
भग्न द्वारकेत मूक बासरी जपायची...
गाव हा नाही तुझा, ना तुझी ही माणसे
सोड सारे, जा पुढे, पूस जाताना ठसे
कैकदा हृदयाहुनी भिंत ओली पाहिली
मी मनांचे पाहिले उंबरे बेजारसे
सावली शोधावया वृक्ष वणवणती इथे
अन् स्वतःला पाडण्या बिंब शोधी आरसे
जाहले आशीषही वास्तुपुरुषाचे मुके
सोयऱ्यांचे चेहरे कोरडे; मौनी घसे
वडिलधाऱ्या सावल्या दे मला माध्याह्निला
ना तरी दे घन तमी वाट-चुकले कवडसे
पावसाचे आगमन दूर नाही फारसे
चेहऱ्यावर काजळी, नेत्रही गर्भारसे
विहर तू बागेत पण विहर चिलखत घालुनी
भृंग, बाणांचे इथे फूल सांगे वारसे
हव्यात जाणिवा जरा, मनात चेतना हवी
जुळे न गीत त्याविना, उरात वेदना हवी
अनंगरंगही दिसो, दिसोत केशरी छटा
अधीर वासना हवी, प्रशांत साधना हवी
निमग्न लोकरंजनार्थ शब्दमाधवी हवी
हवेत शब्द तीक्ष्णही, विचार-चालना हवी
अभंग, भारुडे, स्तवन, कथा, पुराण रोजचे
कधी तरी डफावरील थाप सज्जना हवी
भुकेजले जळे उदर, जळे भुके शरीरही
कशास पेटवून मन अजून यातना हवी ?
जगात दु:ख केव्हढे बघेनही, द्रवेनही
बघायला नजर मला, तुझी, दयाघना, हवी
असोत बंद दार, तावदान, कान, नेत्रही
शिरावयास फक्त एक फट प्रभंजना हवी
पणास काव्य लावता स्वत:च लागलास तू
अजून जीवनात ह्या किती विटंबना हवी ?
कुळात जन्म घेतलास कोणत्या, मिलिंद, तू ?
न जानवे, शिखा इथे; कवीस कल्पना हवी
काय मी सांगू तुला, केव्हा उचलली लेखणी
तू तिथे फुललीस अन् येथे बहरली लेखणी
पाहिले गजगामिनीसम चालता जेव्हा तुला
त्या दिसापासून लिहिताना ठुमकली लेखणी
पाहिले नव्हते तुला, झुंजार होती तोवरी
पाहता तुज काव्यपंक्तींने निथळली लेखणी
काव्य गुजगोष्टीत आहे, काव्य आहे मीलनी
आजवर मी कागदावर का झिजवली लेखणी?
कोडकौतुक संयमाचे मी तिच्या केले खरे
सोबतीने, हाय, पायाच्या घसरली लेखणी
------------------------------------------------------------------------------------
'पिंड गाण्याचा नसे माझा', गरजली लेखणी
शस्त्र हाती घेतल्यागत मी परजली लेखणी
काय ताळू, काय कागद, माणसा संयम कुठे ?
जीभ कोणी उचलली, कोणी उचलली लेखणी !
काय अन् सांगू किती, होते असे कायम तिला
मोजक्या शब्दांत बोलाया न शिकली लेखणी
सांगते तोंडावरी राजासही, "तू नागवा"
ती खरी निर्भीड बाण्याची निपजली लेखणी
लादले निर्बंध त्यांची पेटली सिंहासने
दहशतीच्या प्राणवायूने भडकली लेखणी
छाटल्या जेव्हा जिभा, कैदेत लाखो टाकले
आग झाली, घन तमी पेटून उठली लेखणी
ऐकले नाही कुणाचे, थांबली नाही कधी
हाक आली दूरची तेव्हाच मिटली लेखणी...
मान्य, गर्दी फार येथे अन् तिथे विश्राम आहे
मुक्तिच्या वाटेवरीही हाच ट्रॅफिक जाम आहे
वाट जग ह्याचीच बघतय, मी कधी कोषात जातो
रेशमाचा भाव हल्ली वाढला बेफाम आहे
खूपसे हितशत्रू आणिक वानवा नाही रिपुंची
का तरी माझा स्वत:शी चालला संग्राम आहे?
लक्तरे लेऊन अंगी धाडले होते लढाया
अंत्ययात्रेला परंतू केव्हढा इतमाम आहे
चार खांदे शोधण्यासाठी निघाले प्रेत माझे
बोलले, " नाहीतरी मज काय दुसरे काम आहे? "
मूर्तिपूजेचा 'गुन्हा' चुकला कुणा; सारेच काफिर
पूजती काबा कुणी, कोणास शालिग्राम आहे
उडवुनी घेऊन गेला शब्दपाचोळ्यास वारा
राहिले निष्पर्ण मागे मूक अंतर्याम आहे...
कोरडे राहो न डोळे, आसवांचा शाप दे
जे गुन्हे केलेत मी, पदरात त्यांचे माप दे
जे जसे सुचले मला, केले तसे त्या त्या क्षणी
पात्र नाही मी क्षमेला, फक्त पश्चात्ताप दे
तामसी आयुष्य गेले, शेवटी हा आव का?
तोड ती रुद्राक्षमाला, सोडुनी जपजाप दे
दे सजा, भाळावरीचा काढुनी तू घे मणी
मात्र माझ्या वेदनेला मृत्युचा उःशाप दे
कोरडा उपचार असतो वास्तपुस्तीचा इथे
पूस डोळे अन् खुशालीची जगाला थाप दे...
रक्त हृदयाचे भरावे लागते
चित्र तेव्हा प्रीतिचे साकारते
भासते लावण्य चंद्रासारखे
वाढते, जाते लया, डागाळते
बांध बहराच्या पुराला घालता
साचते, आयुष्य मग शेवाळते
चालते ज्याची मशागत एव्हढी
बाग सुकल्यावीण कोठे राहते ?
दर्पणाला प्रश्न पडतो नेहमी
सरपणाचे का प्रसाधन चालते ?
उमलणे नांदी असो, मृत्यो, तुझी
उमलल्यावाचून कोणी राहते ?
खूप काही आड दडलेले असे
मौन भिंतींचे घराला सांधते
अनोळखी डोळ्यांनी मजला पाहून गेली
जुन्या चुकांची पुनरावृत्ती टाळून गेली
दिला न परिचय, ना विस्कटला कोरा चेहरा
घडी नव्या आयुष्याची सांभाळून गेली
कशास संवादांना आता देऊ उजाळा ?
अखेरच्या अंकावर पडदा पाडून गेली
अमोघ खच बाणांचा हृदयी येऊन पडला
कमान भुवयांची किंचित उंचावून गेली
मिलिंद, रसपानाची द्यावी सोडून आशा
फुले उमलली प्रीतीची, कोमेजून गेली...