Blogger Template by Blogcrowds.

नसतात पाहण्याचे, नसतात सांगण्याचे
हे घाव अंतरीचे असतात झेलण्याचे

खोली कशी कळावी सांगून कोरड्यांना
असतात प्रेमसागर हे आप पोहण्याचे

होऊ नकोस मुग्धा ऐकून गीत माझे
कविता निमित्त आहे संवाद साधण्याचे

जळणे कठीण नसते ज्योतीवरी, पतंगा
असतात प्रश्न अवघड नाते निभावण्याचे

नाते कसे लपावे नजरेतुनी जगाच्या ?
उरले न भान अंतर दोघात राखण्याचे

चुपचाप तेवणारी ज्योतीच दु:ख जाणे
दिनरात प्रियकरांना बाहूत जाळण्याचे

एडगर ऎलन पो ह्याच्या 'Alone' या कवितेचे स्वैर भाषांतर.

लहानपणापासून नव्हतो मी
इतरांसारखा - पाहिले नाही मी
इतरांसारखे - नव्हता त्यांच्यासम
माझ्या भावनांचा उगम.
त्याच स्रोतातून घेतली नाहीत
माझी दु:खे; होई ना जागृत
त्या सुरांवर माझे हृदय आनंदाने;
अन्‌ ज्यावर मी प्रेम केले, केले एकट्याने.
मग - बालपणी - प्रभातकाळी
अत्यंत वादळी आयुष्याच्या - वर आले
चांगल्या-वाईटाच्या खोल गरतेतून
ते गूढ ज्याने मी अजून बद्ध आहे :
प्रवाहातून किंवा कारंज्यातून
डोंगराच्या लाल कड्यावरून
माझ्या भोवती फिरणाऱ्या सूर्यातून
त्याच्या हेमंतातील हेमछटेतून -
सौदामिनीतून आकाशीच्या
माझ्या जवळून लखलखत जाणाऱ्या -
गडगडाटातून व वादळातून,
आणि तो ढग ज्याने घेतला आकार
( शेष आभाळ निरभ्र असताना )
माझ्या नजरेत राक्षसाचा.

पेल्यात बर्फ-किणकिण गंधर्वगान आहे
तव गोड हास्य, साकी, आम्हा अज़ान आहे

उरले न एकही जे मी चाखले न मद्य
केवळ अधरसुधेने मिटली तहान आहे

आयुष्य रोज भरते पेले हलाहलाचे
तेही हसून प्यावे ह्याच्यात शान आहे

नशिबास कोसुनी का सुरई जवळ करावी?
जो नीळकंठ होतो त्यालाच मान आहे

आश्चर्य काय ह्याचे की मी पशू निघालो?
खोलात माणसाच्या घनदाट रान आहे

कारा अभेद्य जेथे मी बंदिवान आहे
आहे तुरुंग काया, मन अंदमान आहे

वर्दी नव्या युगाची जे आरवीत होते
नशिबात कोंबड्यांच्या त्या कंठस्नान आहे

सरकारमान्य गाथा स्वातंत्र्यसंगराची
कादंबरी म्हणावे देदीप्यमान आहे

उपयोग काय त्याच्या ह्या वांझ उगवण्याचा?
काळोख वाटणारा तो अंशुमान आहे

गातात भाट-चारण संपादकीय गाणी
तख्तावरील राजा बहुधा महान आहे !

विद्यार्जनार्थ आलो मी कोणत्या ठिकाणी?
येथे सरस्वतीचे सजले दुकान आहे

अमुचा विठू निराळा, दिंडी असे निराळी
वारी कुबेरघरची हे वर्तमान आहे

प्रत्येक चीज आहे हल्ली जगी विकाऊ
अपवाद ह्यास कोठे माझे इमान आहे?

शब्दांत वेदनांचा करता लिलाव कळले
परदु:ख या जगाला कवडीसमान आहे

झाली प्रवाहपतिता असहाय शब्दनौका
प्रतिभे, तुझे कशाने शमले तुफान आहे?

बोलावले न तोवर गेलो न दर्शनाला
नास्तिक्य हे न दोस्ता, हा स्वाभिमान आहे

मी काय त्यास देऊ, त्याचेच सर्व काही
देण्यास फक्त देवा हे अर्घ्यदान आहे

चालला हा साज अन्‌ शृंगार कोणासाठी ?
काजळाच्या खंजिराला धार कोणासाठी ?

जर प्रवेशाची मुभा तेथे मलाही नाही
किलकिले तव काळजाचे दार कोणासठी ?

सांग मी देऊ कुणाला हृदय आता माझे ?
परत केले त्यास तू साभार कोणासाठी ?

ज्योतही डोळ्यातली नेलीस जाताना तू
ठेवुनी गेलीस हा अंधार कोणासाठी ?

कोण किमयागार होता स्पर्श ज्याने केला ?
कालचा काटा बने गुलज़ार कोणासाठी ?

लावुनी रांगा पुजारी तिष्ठती दारावर
यौवनाची मूर्त तू साकार कोणासाठी ?

बीज स्फूर्तीचे तिच्या पोटी रुजवले कोणी ?
कल्पनांनी लेखणी गर्भार कोणासाठी ?

अंत येई ओळखू पहिल्याच पानावरुनी
त्या कहाणीचा करू विस्तार कोणासाठी ?

आक्रमक घरचा असे की ओळखीचा कोणी ?
पद्मिनींनो, हा नवा जोहार कोणासाठी ?

अक्षरांचा तीन आहे फक्त संधी कोणा
अन्‌ अनाहत नाद तो ओंकार कोणासाठी

उगळलेले प्यार जेथे कोळसे शब्दांचे
अंतरीचे पेटवू अंगार कोणासाठी ?

पाप-पुण्याचे पुराणे चित्रगुप्ती ओझे
वाहुनी फिरतोय मी हा भार कोणासाठी ?

रुष्टता मी अनुनया येते कुठे ?
ओठ ती उष्टावया येते कुठे ?

लागली आहे दुराव्यांची चटक
रोज ती भेटावया येते कुठे ?

आर्जवे ही पाचवीला पूजली
प्रेयसी यदृच्छया येते कुठे ?

पाहिला टेकून माथा रोज मी
फत्तरा, तुजला दया येते कुठे ?

षोडशे, लाजावया लाजू नको
ना तरी शोभा वया येते कुठे ?

पापण्यांच्या आडुनीही बोलती
मूकता चक्षुर्द्वया येते कुठे ?

अंतरीची प्रीत लपते का कधी ?
त्याविना गाली रया येते कुठे ?

प्रेमगुंजन करत फिरसी उपवनी
'भृंग' निष्ठा प्रत्यया येते कुठे ?

गावेसे वाटते गीत माणसांचे
शोधू कोठे खरे सूर ते कळेना
आज्ञाधारक कधी शब्द दास होते
प्रतिभा त्यांची अता बटिक पाहवेना
आधी हुंकारही शब्दरूप होई
आता शब्दांतही अर्थ आढळेना
झाली कविता जसे डोह मृगजळाचे
जीवन आभासमय प्यावया मिळेना
अर्थानर्थातला काव्यप्रांत धूसर
शब्दारण्यातुनी मार्ग सापडेना
अमुच्या ह्या मैफिली काव्यकाजव्यांच्या
अंधाऱ्या अंतरी ज्योत पोहचेना
नाही आक्रोश ना भावचित्र हळवे
आहे कारागिरी, सत्य हे लपेना
कवितेचा बाज अन्‌ साज ल्यायलेल्या
ओळी वारांगना ज्या हृदी वसेना
तावांची पानगळ 'भृंग' फार झाली
सरला लेखनबहर परतुनी फिरेना

मीच माझा धर्म आणिक
मीच आहे संप्रदाय
मीच प्रेषित, भक्त मी अन्‍
मीच आहे देवराय

क्षुद्र, कोता मी जिवाणू
मी घटोत्कच भीमकाय
कांबळी अन्‍ घोंगडी मी
अन्‍ कधी मी घट्ट टाय

कृष्ण काळा-सावळा मी
सांब शंकर गौरकाय
इंद्र मी लाचार याचक
वामनाचे मीच पाय

मर्द मी तो सव्यसाची
क्लीब किन्नर मीच नाची
मी युगांची साक्ष साऱ्या
मी खलांच्या लूटमाऱ्या

सोवळा मी, ओवळा मी
पक्व किंवा कोवळा मी
शोधतो गुंत्यात साऱ्या
कोणता आहे खरा मी

यातला मी एक धागा
एकरंगी, एकढंगी
गुंतुनी वा वस्त्र झालो
मर्त्य मानव सप्तरंगी ?

Newer Posts Older Posts Home