पेल्यात बर्फ-किणकिण गंधर्वगान आहे
तव गोड हास्य, साकी, आम्हा अज़ान आहे
उरले न एकही जे मी चाखले न मद्य
केवळ अधरसुधेने मिटली तहान आहे
आयुष्य रोज भरते पेले हलाहलाचे
तेही हसून प्यावे ह्याच्यात शान आहे
नशिबास कोसुनी का सुरई जवळ करावी?
जो नीळकंठ होतो त्यालाच मान आहे
आश्चर्य काय ह्याचे की मी पशू निघालो?
खोलात माणसाच्या घनदाट रान आहे
कारा अभेद्य जेथे मी बंदिवान आहे
आहे तुरुंग काया, मन अंदमान आहे
वर्दी नव्या युगाची जे आरवीत होते
नशिबात कोंबड्यांच्या त्या कंठस्नान आहे
सरकारमान्य गाथा स्वातंत्र्यसंगराची
कादंबरी म्हणावे देदीप्यमान आहे
उपयोग काय त्याच्या ह्या वांझ उगवण्याचा?
काळोख वाटणारा तो अंशुमान आहे
गातात भाट-चारण संपादकीय गाणी
तख्तावरील राजा बहुधा महान आहे !
विद्यार्जनार्थ आलो मी कोणत्या ठिकाणी?
येथे सरस्वतीचे सजले दुकान आहे
अमुचा विठू निराळा, दिंडी असे निराळी
वारी कुबेरघरची हे वर्तमान आहे
प्रत्येक चीज आहे हल्ली जगी विकाऊ
अपवाद ह्यास कोठे माझे इमान आहे?
शब्दांत वेदनांचा करता लिलाव कळले
परदु:ख या जगाला कवडीसमान आहे
झाली प्रवाहपतिता असहाय शब्दनौका
प्रतिभे, तुझे कशाने शमले तुफान आहे?
बोलावले न तोवर गेलो न दर्शनाला
नास्तिक्य हे न दोस्ता, हा स्वाभिमान आहे
मी काय त्यास देऊ, त्याचेच सर्व काही
देण्यास फक्त देवा हे अर्घ्यदान आहे
Labels: गझल