Blogger Template by Blogcrowds.

एक अक्षरावर आकांत कशास?
बोल, रामशास्त्र्या, देहान्त कशास?

ही जरा तनुची, तारुण्य मनात
ही अशी अघोरी संक्रांत कशास?

एकही न उरला जळण्यास पतंग
वांछिलास, ज्योती, एकांत कशास?

माणसे न कोणी, रेडेच समोर
माउली वदावे वेदांत कशास?

विश्वरूप रुचले ज्याला न 'मिलिंद'
आंधळ्यास असल्या दृष्टांत कशास?

ओठांवरले हासू अवखळ
गात्री चैतन्याची सळसळ
हेमरंगी तव कांतिस ये
रातराणीचा मादक दरवळ
काजळचर्चित नेत्र तुझे हे जीवनभरले मेघ जणू
डोळ्यांत रंगला इंद्रधनू ॥धृ॥

दाट मोकळे कुंतल काळे
अधरांचे मनमोहक चाळे
रंभा अथवा मस्तानीचे
लावण्य न याहुनी निराळे
तुझ्या स्मितांनी मोहरला ग वठलेला हा देहतरू
डोळ्यांत रंगला इंद्रधनू ॥१॥

सौदामिनी तू अवकाशाची
चाल मानसीच्या हंसाची
सखे तुझ्या ठायी एकवटली
शस्त्रास्त्रें सारी मदनाची
तव प्रीतिच्या झर्‍यात न्हाऊन पुलकित अवघी होय तनू
डोळ्यांत रंगला इंद्रधनू ॥२॥

लोप न पावो हास्य लकेरी
भरुन वाहो सौख्य अंतरी
तुला पहावी अशीच चंचल
कधी लाजरी, कधी नाचरी
आनंदाच्या सुखद क्षणांनी आयुष्याचे वस्त्र विणू
डोळ्यांत रंगला इंद्रधनू ॥३॥

काही क्षणांचे गुच्छ
काहींचे वेचे
थॊड्या मोळ्या
आणि असंख्य ढेकळं...

गुच्छ कोमेजले, वेचे विखुरले
मोळ्यांच्या काटक्या सरपण होऊन जळून गेल्या
ढेकळं मात्र चिवट निघाली
काळाच्या ओघात वाहून, विरघळून गेली नाहीत

त्यांचे दगड झाले
चाललेल्या प्रत्येक निरुपयोगी मैलाची साक्ष देणारे
आठवणींच्या थडग्यांच्या डोक्याशी उन्मत्त उभे
चिरे होऊन ही ढेकळं
अव्याहत चिणत असतात मला
क्षणांनो, तुम्ही क्षणभंगुरच बरे होता

कोरड्या कोल्हेकुईस भीक तू घालू नको
सनातनी कर्मठांची भीड तू ठेवू नको
हे न त्यांचे वाळवंट, प्रांत हा भिजल्या मनांचा
नि:शंक ओठी प्याला घे सोनेरी शांभवीचा

हे निषिध्द, ते हराम,जीवनी असल्या नाही राम
धर्म, नीति, पाप-पुण्य दे यांना घटकाभर विराम
सुरासुरें प्राशिली जी विटाळ कसला त्या सुरेचा
नि:शंक ओठी प्याला घे सोनेरी शांभवीचा

फेसाळत्या चषकात आकंठ चल बुडुया गडे
मूढ ते ज्यांना असे ह्या अमृताचे वावडे
रिचवला ज्याने घोट एक भक्त तो झाला तियेचा
नि:शंक ओठी प्याला घे सोनेरी शांभवीचा

कर शिथिल शिस्त थोडी, आयुष्य न होवो जन्मठेप
तना-मनाच्या घावांवरी हीच मात्रा, हाच लेप
उंबरठा ओलांड, सखे, सोवळ्या कारागृहाचा
नि:शंक ओठी प्याला घे सोनेरी शांभवीचा

लक्ष योनींच्या प्रवासी एक जन्म माणसाचा
व्यर्थ त्या दवडू नको होऊन पशु दावणीचा
श्रुंखला तुटतील तव आस्वाद घेता वारुणीचा
नि:शंक ओठी प्याला घे सोनेरी शांभवीचा

आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ खेळू रोज आपण
बंद दारे, बंद खिडक्या, रेशमी कोषात राहू
चार भिंतींच्या महाली चालला संसारगाडा
हीच चाकोरी सुखाची, चौकटीचे दास होऊ
या दुतर्फा वाहणाऱ्या माणसांचे काय आम्हा
ना पडो नजरेस कोणी, झापडं डोळ्यास लावू
आपल्या दीपोत्सवाला झालरी ज्यांच्या तमाच्या
दान हा अंधार त्यांना मुक्तहस्ते आज देऊ
साजिऱ्या नगरास शोभे, सांग का वास्तव्य त्यांचे
का ठिगळ ही लक्तरांची भरजरी वस्त्रास साहू
कोंडवाडा गाव झाला, गाय भाकड, बैल पंगू
गुदमरू येथे कशाला, सागराच्या पार जाऊ
पाहुनी ते दुःख परके, षंढ येवो ना उमाळा
शाल गेंड्याच्या त्वचेची पांघरू अन् गाढ झोपू


मी मना आकाशवेड्या बंद केले चौकटीत

झिरपतो थोडाच आता चंद्र माझ्या झोपडीत

अंजनीसूताप्रमाणे झेप घेता उंच उंच

पंख जळले मित्रतेजे, कोसळे पक्षी दरीत

ऐन तारुण्यात होती पाहिली जी भव्य दिव्य

आज स्वप्नं एकवटली ती उद्याच्या भाकरीत

गवसणी क्षितिजास घालू, हा मनोहारी विचार

धाव ठरली कुंपणाची, जन्म गेला चाकरीत

माणसा करते पशू ही आग पोटाची कराल

भाकरी भाजायची तर घाल ती तत्त्वं चुलीत

सत्य विजयाची कहाणी भासते जहरी विनोद

काय'द्या'चे राज्य येथे, न्याय नाही चावडीत


कोण ऐके पुकार आसवांची ?
व्यर्थ वाहेल धार आसवांची

आज झालेत कर्जमुक्त डोळ
फेडली मी उधार आसवांची

पुष्पशय्या दिली तिला निजाया
अन स्वत:ला पथार आसवांची

चित्र आहे अपूर्ण प्रीतिचे हे
रेष गाली चितार आसवांची

झेलली मी अमोघ सर्व शस्त्रे
विंधते पण पहार आसवांची

रूप, यौवन, अदा ठरे निकामी
फक्त उरली मदार आसवांची
( ह्या शेरातील आणि त्यावरील शेरातील विचार साधारणपणे सारखेच आहेत. पण आधीचा शेर पुरुषाच्या व हा स्त्रीच्या दृष्टिकोनातून आहे.)

हे अनाहूत नेहमीच येती

रीत थोडी सुधार आसवांची

आठवांच्या, मिलिंद, तू सरींने
आज तृष्णा निवार आसवांची

Newer Posts Older Posts Home