प्रेरणा : पृथ्वीचे प्रेमगीत (तात्यासाहेब, बालकाला क्षमा करा. )
शब्द धन ज्याचे, खरा श्रीमंत आहे
लोक का भीतात एकाकीपणाला
कोण कोणाचा इथे आद्यंत आहे?
मी तिला ठरवूनही सोडू न शकलो
मी कुठे श्रीराम वा दुष्यंत आहे?
राजकारण खेळ आहे लेबलांचा
कालचा डावा अता सामंत आहे
पक्षही ओवाळला आहे तुझ्यावर
सांग, खुर्चे, कोण निष्ठावंत आहे?
उभयतांचा कोंडमारा होत आहे
अप्सरेच्या सोबतीला संत आहे
गाठ मरणाशी, स्मशानाशीच कायम
भूत ना वेताळ, तो किरवंत आहे
काय चुकले, पूजले जर मी स्वत:ला
'भृंग', सर्वांच्यात जर भगवंत आहे?
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
दारू, सत्ता, पैसा, नारी; ध्येय वेगवेगळे
0 comments Posted by Milind Phanse at Saturday, December 21, 2013नशा तीच, पण प्रत्येकाचे पेय वेगवेगळे
एक जरी हा प्रवास आणिक अंत एक सर्वांचा
वेगवेगळी ओझी अन् पाथेय वेगवेगळे
स्तन्याचे, वात्सल्याचे, प्रीतीचे, कर्तव्याचे
आयुष्याच्या हर टप्प्याचे देय वेगवेगळे
मोळी बांधा, साकल्याने अर्थ लावता येतो
शब्द एरवी कवितेचे अज्ञेय वेगवेगळे
अस्थैर्याची, चंचलतेची चर्चा जेव्हा होते
'भृंग' मूर्त उपमान एक, उपमेय वेगवेगळे
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
करावी किती, कोंबड्या, वंचना
कितीदा करू पार रस्ता अशी मी
कितीदा करू प्रीतिची याचना
खुराड्यातले ना उमाळे उसासे
न ती आज अंगास आता पिसे
विझोनी अता यौवनाच्या मशाली
खुडुक जाहले, एक अंडे नसे
परी खांब रस्त्यावरी तो विजेचा
अविश्रांत राही उभा सोबती
पकडण्या तुला मार्ग ओलांडते मी
पळे तू पुढे आणि मी मागुती
किती कोंबडे ते नटोनी थटोनी
शिरी टाकिती माझिया अक्षता
तुर्यावाचुनी पण तुझ्या, कुक्कुटा रे
मला वाटते विश्व सारे वृथा
तुवा सांडलेले कुठे पोल्ट्रि फार्मात
वेचून स्वादिष्ट धान्यकणऽ
मला मोहवाया बघे कावळा हा
करू जात मजला व्यभीचारिणऽ
निराशेत फ्रस्ट्रेट होऊन बैसे
ऋषींच्या कुळी तो विफल पोपटऽ
पिसाटापरी चोच चोचीत घालुन
करी आर्जवे पारवा लोचटऽ
पिसारा पिसांचा उभारून दारी
पहाटे उभा मोर करण्या छळ
करी प्रीतिची मागणी बेशरम
पंख पंखावरी ठेवुनी कोकिळ
मिठी घालुनी कोंबड्याला परी मी
घेऊ गळ्याशी कसे पारवे
शहारून येते कधी अंग; तूझ्या
स्मृतीने उले अन् सले तंदुर
गमे की तुझ्या सोबती आरवावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लांब चोचीतली विडि प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा
अमर्याद रस्ता मध्ये कोंबड्या अन्
असे खास मी कोंबडी सज्जनऽ
परी त्यास ओलांडल्यावाचुनी रे
घडावे कसे आपले मीलनऽ
Labels: parody, poetry, कविता, पृथ्वीचे प्रेमगीत, विडंबन
पकडला न गेल्यामुळे नेक आहे
जुनी तीच गाडी, नवा मेक आहे
पुरुष आजही तोच दिलफेक आहे
नवे स्त्री-पुरुष ते, नवे युग, नवे जग
... जुन्या वासनांचाच उद्रेक आहे
किती लोक येथे निर्या ओढणारे
इथे देवकीचा कुणी लेक आहे...?
बलात्कार होतात दररोज येथे
समाजातला क्षोभ व्यतिरेक आहे
"हवे आणखी काय त्या पीडितेला?
पहा, शासनाने दिला चेक आहे!"
पुन्हा घोषणा त्याच, अन् तेच अश्रू
पुन्हा क्षार जखमांवरी सेक आहे
बहरण्यास भयभीत झालीत झाडे
भुकेला इथे 'भृंग' प्रत्येक आहे
नररुंड मोजताहे निर्जीव लोकशाही
कुरणात हिरवळीचा ना मागमूस काही
जितका मनुष्य चरतो, चरतील काय गाई?
युद्धात जीवनाच्या इतकीच फक्त ग्वाही
राजे खुशाल; पडती मृत्यूमुखी शिपाई
लागेल फोडणीला तितकाच हातभारऽ
आश्वासनांत डोंगर अन् पूर्ततेत राई
वाढीव किंमतींनी कंठास प्राण आले
सगळेच तंग झाले, उसवू कुठे शिलाई
गेला खिशात केव्हा पाठीवरील तो कर?
मी पाहतो अचंबित ही हातची सफाई
निवडून कोण आले हा प्रश्न व्यर्थ आहे
बदलेल काय त्याने हा प्रश्न मर्मग्राही
डावे वळण असो की उजवीकडील रस्ता
देशोधडीस नेती आम्हा दिशा दहाही
हे रोमराज्य चालो की 'राम'राज्य येवो
पण पाचवीस अमुच्या पुजल्येय मोगलाई
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
काव्य दुखर्या अंतरीचे दूत होते
शब्द होते, अर्थ होते, द्वैत होते
का असे तुकड्यात माझे गीत होते?
प्राक्तनाने मी कवी झालो असावा
भाग्य उदयाला खरे तर नेत होते
कूस कवितेची कशी उजणार, सांगा ?
क्षेत्र वांझोटे, नपुंसक रेत होते
राहिले सांगावयाचे ते तळाशी
पृष्ठभागी काव्यसदृश प्रेत होते
जे लिहू, मानेवरी येऊन बसते
वर्तमानाचे अखेरी भूत होते
कोण, कुठला तू, स्वत:ला पूस 'कोहम्'
वेद रचणारे कवी अज्ञात होते
Labels: ghazal, Marathi ghazal, कविता, गझल, मराठी गझल
कधी मेनकांनी तपोभंग केले
गुरू तेच अध्यात्ममार्गावरीचे
सग्यासोयर्यांनीच नि:संग केले
मना मोह होता सदोदीत श्रीचा
मुखे नित्य "श्रीरंग, श्रीरंग" केले
दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले
कशाला, सखे, मंदिरी जाग्रणे ती?
तुझ्या बाहुपाशात सत्संग केले
पहा दूर सारून हा शब्दपडदा
मनाचे उघड अंग-प्रत्यंग केले
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
चुरगाळल्या शब्दात कविता शोधतो
टीपांत अन् कंसात कविता शोधतो
अर्थास शैलीदार फाशी देउनी
शृंगारल्या प्रेतात कविता शोधतो
होते कुठे, जग चालले आहे कुठे
मी आपला परसात कविता शोधतो
येता गझल होऊन यौवन लाजरे
अरसिक पहा, ग्रंथात कविता शोधतो
धुंदी कमी, जितके अधिक फेसाळणे
मी घोटभर निर्वात कविता शोधतो
पुसतात ज्यांनी झोकली नाही कधी
"हा कोणत्या कैफात कविता शोधतो?"
संसार, पेशा, प्रकृतीचे तापत्रय
देऊन त्यांना मात कविता शोधतो
केव्हातरी गवसेल, थोडा वेळ दे
पसरून लिहिते हात कविता शोधतो
होता रिते साहित्य, रमणी अन् चषक
निर्गुण निराकारात कविता शोधतो
Labels: ghazal, Marathi ghazal, कविता, गझल, मराठी गझल
मातली काळोखसत्ता, सूर्य सारे अस्त झाले
हिंद देशा; चोर, डाकू, ठग तुझे विश्वस्त झाले
भूक म्हणजे काय असते भारतीयांना समजले
ह्या इथे गाई-गुरांचे खाद्य देखिल फस्त झाले
देशसेवा, तत्त्व, निष्ठा, त्याग, संयम, प्रेम, शांती
ह्या महागाईत, बाकी, शब्द तितके स्वस्त झाले
बातम्या देण्यात रस उरला कुठे वार्ताहरांना?
ते दलालीवर नट्यांचे रोकडे मध्यस्त झाले
केस सीबीआयच्या हाती दिली न्यायाधिशांनी
"हुश्श"! मंत्री आणि बाबू पूर्णत: आश्वस्त झाले
बैसती बांधून डोळे सिंह ते सिंहासनावर
एक पायावर उभे बगळे जणू संन्यस्त झाले
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
चतुर्भुज होउनी आपापले अंगण मिळाले
कुणा घरपण मिळाले, तर कुणाला रण मिळाले
कशाला सोहळ्यांसाठी फुका पंचांग बघता?
करावे साजरे जे जे सुखाचे क्षण मिळाले
रिता पेला कधी दिसला न मधुबालेस माझा
भले नंतर तिच्या डोळ्यांतुनी तर्पण मिळाले
जरा उघडून डोळे माणसांना पाहिल्यावर
कधी प्राणी, कधी दानव, कधी सुरगण मिळाले
किनार्यावर जरी चालून गेल्या लाख लाटा
चढाईतून त्यांना फक्त वाळूकण मिळाले
निवडणुक पार पडली, लोकशाही तृप्त झाली
दरिद्र्यांना नवे नवकोट नारायण मिळाले
कवच बेकायद्याचे सत्यही भेदू न शकले
खुन्याला फौजदाराचेच संरक्षण मिळाले
तसा वर्षाव सर्वांच्या शिरी केला जगाने
कुणाला पाकळ्या कोमल, कुणाला घण मिळाले
निघाला 'भृंग' कवितेने समाजाला बदलण्या
बदलले हेच, बैलांना नवे वैरण मिळाले
Labels: ghazal, Marathi ghazal, गज़ल, गझल, मराठी गझल
