Blogger Template by Blogcrowds.


प्राण्यांना शोधत आहे, मी जंगल शोधत आहे
नेसूच्या वस्त्रांपुरते मी वल्कल शोधत आहे

हे नागवलेले पर्वत, हे माळरान बोडके
वाऱ्यावर विहरत येती दुर्गंध नासके-कुजके
या पूज्य नदीचे झाले विष्ठा भरलेले डबके
ही रसायनांची गंगा भूजलात मिसळत आहे
अन् समुद्रलाटांवरती तेलाचा तवंग आहे

पाऊस अवेळी पडतो, मोसमात गायब असतो
ग्रीष्मात पूर येतो अन् आषाढ कोरडा जातो
का ऋतुचक्राची चाके एकेक लागली निखळू ?
पृथ्वीच्या शेंड्यावरचा तो बर्फ लागला वितळू

धोक्याची वाजे घंटा, जागा हो मनुजा आता
का बलात्कार पृथ्वीवर करसी तू येता-जाता ?
अद्याप तुझे पृथ्वीने अपराध घातले पोटी
त्या शिशुपालाचे शंभर, मनुजा तव कोटी-कोटी
जागते, होतसे कृत्या, अंगास झटकते धरती
वादळे सुदर्शन आणिक भूकंप वासवी शक्ती

देशांतर करता येते पृथ्वीच्या पाठीवरती
पण ग्रहांवरी ना दुसऱ्या करता येई तुज वस्ती
तुज ठिकाण नाही दुसरे, दुसरा ना कोठे थारा
ही घरटे आहे आणिक ही धराच आहे कारा...

तोल

काजळकाळ्या नयनि असावे, अधरांच्या गोडीत असावे

रहस्य माझ्या पराभवाचे मोहक त्या जिवणीत असावे


हातांमध्ये हात असावे, ओठांवरती गीत असावे

एकांताच्या ताल-सुरांनी नटलेले संगीत असावे


कुठल्या दूताच्या हाती मी निरोप धाडू समजत नाही

पाळत इतकी तिच्यावरी की मेघाला अडवीत असावे


रीत जगाची मोडत असता, रिवाज सारे तोडत असता

धीट असावे थोडे आपण, थोडेसे भयभीत असावे


तोल कशाने, मिलिंद, हल्ली दोघांचाही जातो आहे ?

मद्याचे गुणधर्म कदाचित विरघळले प्रीतीत असावे

पीस

छेडता मी गीत, मोहरलीस तू
शब्द फुंकर, भाव वारा, पीस तू

अर्थ छेडू लागले शब्दांतले
होउनी मग तार थरथरलीस तू

धुंद झालो ऐकुनी आरोह मी
का समेवर येत अवघडलीस तू?

विस्कटाया लागली माझी घडी
ह्या घडीसाठीच ना सजलीस तू?

शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी?
राहिली आहेस त्या ओलीस तू!

मंद हास्याचा उखाणा कूट वा
गूढ तू कोडे, कुणा सुटलीस तू?

मी तुझ्यावाचून होतो पांगळा
पूर्तता, अर्धांगिनी, ठरलीस तू...

गझल

ना कुणी कल्याणकर्ते शेष आता
राज्यकर्ते लांडगे वा मेष आता

शेत सुकले, कर्ज थकले, मॉल सजले
केव्हढा बदलून गेला देश आता

बैल जो बसला, पुन्हा उठलाच नाही
वैरणीचा राहिला ना लेश आता

आदिवासींनो, नका राहू उपाशी
शासनाने काढला आदेश आता

एकही नाही कुपोषित मूल येथे
पोटभर मिळतात अध्यादेश आता

राहिली लोकांस ना ऊर्मी लढ्याची
राहिला नाही जुना आवेश आता

नाग बसले व्यापुनी सहकारयमुना
कालिया सारे, कुणी ना शेष आता

सांगली, बारामती, लातूर, करविर
यापुढे उरला नसे का देश आता ?

कधी

"हो" कधी, "नाही" कधी अन्‌ "कदाचित" ही कधी
काय समजावे कुणी ? ठाम असते ती कधी ?

रोज माझा प्रश्न अन्‌ रोज चतुराई तिची
टाळते हसुनी कधी, मागते अवधी कधी

हा निरागस चेहरा, हास्य हे मनमोकळे
वाटते अल्लड कधी, वाटते खेळी कधी

बांध पाटाला कधी जीवनाच्या घालते
आणि होते त्यावरी कागदी होडी कधी

ती कधी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते
फेर धरुनी नाचते जाणिवांभवती कधी

ती जरी नसली तरी श्वास माझा चालतो
येत नाही त्यास पण गंध कस्तूरी कधी

अंथरावी लागते वेदना हृदयातली
चालुनी येते गझल, 'भृंग', का सहजी कधी ?


डोळ्यातली तुझ्या ना मी वेदना समजलो
प्रेमास ना समजलो, नाही मना समजलो

मस्तीत जीवनाच्या, धुंदीत यौवनाच्या
तृप्तीस इंद्रियांच्या संवेदना समजलो

झाले असह्य जेव्हा, मिटलेस फक्त डोळे
मिटण्यासही तुझ्या त्या मी वासना समजलो

माझेच नाव व्यापी तव पुस्तकास अवघ्या
तळटीप वा तुला मी प्रस्तावना समजलो

समजून हेम धरले छातीस हीन कथला
लक्ष्मीस मी गुणांच्या निष्कांचना समजलो

कळले न आतड्यांचे तुटणे तुझ्या कधीही
शब्दांस काळजीच्या निर्भर्त्सना समजलो

धरती क्षमाशिला अन्‌ अपराध पावसाचे
परमेश्वरी कृपेची ही योजना समजलो

सरला वसंत, उरले काटे उरात बाकी
तेव्हा फुलारण्याची मी यातना समजलो...

Newer Posts Older Posts Home