"हो" कधी, "नाही" कधी अन् "कदाचित" ही कधी
काय समजावे कुणी ? ठाम असते ती कधी ?
रोज माझा प्रश्न अन् रोज चतुराई तिची
टाळते हसुनी कधी, मागते अवधी कधी
हा निरागस चेहरा, हास्य हे मनमोकळे
वाटते अल्लड कधी, वाटते खेळी कधी
बांध पाटाला कधी जीवनाच्या घालते
आणि होते त्यावरी कागदी होडी कधी
ती कधी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते
फेर धरुनी नाचते जाणिवांभवती कधी
ती जरी नसली तरी श्वास माझा चालतो
येत नाही त्यास पण गंध कस्तूरी कधी
अंथरावी लागते वेदना हृदयातली
चालुनी येते गझल, 'भृंग', का सहजी कधी ?
0 Comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)