Blogger Template by Blogcrowds.

का कधी कोणी फुलांचे घाव होते पाहिले ?
फक्त बाजारात त्यांचे भाव होते पाहिले

भाबड्या डोळ्यांत अंजन होउनी निर्घृणपणे
अनुभवांचे झोंबरे शिरकाव होते पाहिले

ते बरे होते विरोधक उघड ज्यांची दुष्मनी
मी स्वकीयांचे छुपे अटकाव होते पाहिले

प्रेमपत्रें, पंचनामा, कागदाला एकसे
लेखणीचे सर्व त्याने स्राव होते पाहिले

निवडताना फूल नाही चाखले मकरंद मी
'भृंग', त्यानेही तुझे, बस, नाव होते पाहिले

प्रत्येक शर्यतीचा मी भाग होत गेलो
हर एक मृगजळाचा मी माग घेत गेलो

मोडीत काढली ती तत्त्वे जुनाट सारी
बहुमोल दागिन्यांना मी डाग देत गेलो

दु:खात काय मोठे, ते रोजचेच आहे
घेऊन मी सखीसम त्याला कवेत गेलो

टीकास्त्र सोडणारे जमले किती शिखंडी
अर्जुन कुणी नसावा ह्या वंचनेत गेलो

जा वैषयिक सुखांनो, शोधा नवीन गात्रे
चिरकालच्या सुखाच्या आता गुहेत गेलो

मस्तीत जीवनाला मी कुर्नीसात केला
मृत्यूस भेटण्याही मोठ्या मजेत गेलो

ह्या कागदी फुलांच्या सोडून, 'भृंग', बागा
स्वप्नातल्या कळीचा मी शोध घेत गेलो

मी गुन्हे अक्षम्य केले ही खरी आहे व्यथा
त्यासही तू माफ केले ही खरी आहे व्यथा

वाट मी चुकलो कितीदा, सांगती जे जे मला
काननी त्यांनीच नेले ही खरी आहे व्यथा

जुलुम आहे कोरडे हे वागणे, साकी, तुझे
त्यावरी हे रिक्त पेले ही खरी आहे व्यथा

लोकहो, पुसता कशाला प्रांत माझा कोणता
देश येथे फाटलेले ही खरी आहे व्यथा

जहर टीकेचे जनांच्या पचवले असतेच मी
वाचल्यावाचून गेले ही खरी आहे व्यथा

अजून ऐकू तिला न येई तुझे तराणे, तुझी कहाणी
भरून आहे तिच्या कदाचित अजून कानी जुनी विराणी

अजून त्याच्याच चेहऱ्याची करे प्रतीक्षा नयननिरांजन
अजून डोळ्यांत आठवांचे विटाळलेले गढूळ पाणी

म्हणायला राहिलीत मागे कुंवारतेची फुलं सुगंधी
फळाफळातून वेल गाते दुरावल्या प्रीतिचीच गाणी

जरी कधीची विरून गेली धुक्यात ती आकृती सख्याची
अजून स्वप्नात स्पष्ट दिसते छबी तयाची उदासवाणी

विषाद याचा मला नसे की नकार उमटे तिच्या मुखातुन
उरेल आजन्म दु:ख हे की कडाडली, हाय, शापवाणी

असेल हातात सोमप्याला, स्मरेल खय्यामची रुबाई
नसेल विरहात सोबतीला तयापरी सुंदरी इराणी

तिच्या मनी का 'मिलिंद' प्रीती तुझ्यामुळे अंकुरे नव्याने ?
करून गेली तुला भस्म ती जसे मन्मथा पिनाकपाणी

अपुले मला म्हणावे आता तरी सुखाने
ग्राहक बनून फिरलो त्याची किती दुकाने

होतो जरी निघालो शोधात संगिनीच्या
वाटेत आड आली ती सौख्यबारदाने

ज्या मैफिलीत गेलो तिथली शमा म्हणाली
"आला, हुजूर, आपण, आले जुने जमाने"

रस्त्यातल्या मुलांच्या दिसली गळ्यात पाटी
"रक्तात आमच्याही तुमचीच खानदाने"

झालीत बंद मजला बहुतेक सभ्य दारे
सजलेत स्वागताला वस्तीत चोरखाने

माझ्याच उंबर्‍याला आलो न ओळखू मी
जामीन राहिली मग रंगेल तावदाने

वाटे 'मिलिंद' आता हा खेळ आवरावा
तुडवून खूप झाली शृंगारली स्मशाने

गझल

आग नाही, धूर नाही
राख होणे दूर नाही

घाव केले, खून नाही
हो, तशी ती क्रूर नाही

विरह भोगावा सखीचा
मेळ तिज मंजूर नाही

तागडी दु:खास कसली ?
(एक अश्रू पूर नाही ?)

धडधडे पाहून तुजला
'भृंग' ते हे ऊर नाही

कधी प्रेयसी, कधी असे ती हट्टी दुहिता
शब्दथव्यांची किलबिल आहे माझी कविता ॥धृ॥

कधी खळाळे निर्झर होऊन पानोपानी
अल्लड, अवखळ अर्थहीनशी येई कानी
कधी शांत अन्‍ निश्चल असते सरोवरासम
तरंग उठती अर्थछटांचे जिथे विहंगम
कधी सुवासिक आम्रमंजिरीचुंबित वारा
कधी शिरी आघात करी ह्या अक्षरगारा
कधी मेघ ती होऊन वर्षे रिमझिम रिमझिम
तनामनाला भिजवून जाई माझी कविता ॥१॥

कधी दिसे ती सालंकृतसी रूपगर्विता
कुंजवनातील रासरंजना सखी गोपिका
लंकेची ती कधी पार्वती हो‍ऊन येते
पौलस्त्याचा उपवनातली विरही सीता
कधी पुरंध्री, कधी कामिनी, कधी योगिनी
कळे न मजला रूप बदलते कोणाकरिता
क्षणोक्षणी पण रंग बदलते माझी कविता ॥२॥

कळे न अजुनी कोण आपला, कोण परावा
अजून अनुभव आयुष्याचा कमी असावा
कसे जमावे गंगेसम तिज विशाल होणे ?
मिणमिणणाऱ्या पणतीला ह्या मशाल होणे ?
काव्य न केवळ ते शब्दांचे हमाल होणे
किनारपट्टीची ती केवळ वाळू ओली
कशी सागराची यावी तिज अथांग खोली ?
गाज हो‍ऊनी गरजत नाही माझी कविता ॥३॥

झाले जुने नभाचे ते चंद्र, सूर्य, तारे
वृद्धाश्रमात त्यांना भरती करू, चला रे

अग्नीस काष्ठ लागे, अग्नीस तेल लागे
जळतात इंधनाविण पोटातले निखारे

येथे युगायुगांची चाले उपासमारी
अनान्न माणसांना मिळती अमाप नारे

वाया अनेक गेली नापीक वाम वर्षे
पाण्यात मृगजळाच्या पिकतील का शिवारे ?

घेतात लोक हल्ली का मुक्त श्वास येथे ?
बसवा पुन्हा मनांवर ते कालचे पहारे

जाती नव्या दिशांना शोधात संपदेच्या
रस्त्यात माणसांच्या पेरा जुने निखारे

निर्धास्त व्हा सुरांनो, अमृत न मागतो मी
बस, मेघमाऊलीचे तम-ऊर दाटवा रे

सोप्या करून सांगू जखमा, मिलिंद, त्यांना
करतात क्लिष्टतेचा आरोप वाचणारे

Newer Posts Older Posts Home