अपुले मला म्हणावे आता तरी सुखाने
ग्राहक बनून फिरलो त्याची किती दुकाने
होतो जरी निघालो शोधात संगिनीच्या
वाटेत आड आली ती सौख्यबारदाने
ज्या मैफिलीत गेलो तिथली शमा म्हणाली
"आला, हुजूर, आपण, आले जुने जमाने"
रस्त्यातल्या मुलांच्या दिसली गळ्यात पाटी
"रक्तात आमच्याही तुमचीच खानदाने"
झालीत बंद मजला बहुतेक सभ्य दारे
सजलेत स्वागताला वस्तीत चोरखाने
माझ्याच उंबर्याला आलो न ओळखू मी
जामीन राहिली मग रंगेल तावदाने
वाटे 'मिलिंद' आता हा खेळ आवरावा
तुडवून खूप झाली शृंगारली स्मशाने
Labels: गझल
1 Comment:
-
- रोहित said...
17/4/07 7:45 pmकविता आवडली. शृंगारलेल्या स्मशानांची प्रतिमा खूपच स्पर्शी आहे. तुमच्याकडून असेच लिखाण वाचायला मिळत राहो.
Subscribe to:
Post Comments (Atom)