Blogger Template by Blogcrowds.

बोचणारे का असे उपदेश देता ?
मी सुखी आहे, कशाला क्लेश देता ?

यौवनाला वस्त्र शोभे सप्तरंगी
पांढरे त्याला कसे गणवेश देता ?

भोगण्याला राहिले आयुष्य थोडे
अन् विरक्तीचा अता संदेश देता !

जीवनी विषयात होतो रंगलेलो
का मढ्याला व्यर्थ भगवा वेष देता ?

नेमले मध्यस्त देवाने न तुम्हा
का तुम्ही त्याचे मला आदेश देता ?

चोखयाचा अन् जनीचा देव माझा
काय दगडांचे मला अवशेष देता ?





थोडे दर्भ अन् काही लाकडं धुमसणारी
काळ्या विहंगाची वाट पाहत चुळबुळणारे काही चातक
हळूच चोरट्या नजरेने घड्याळ पाहणारे
आहेत जिथे डोळ्यात आसवं तीही
'आता माझं कसं होणार' या विवंचनेची
बाकीच्या नजरांतून डोकावताहेत
हिशेब उद्याच्या वाटण्यांचे
अन् धाकधूक मृत्युपत्राची
स्थितप्रज्ञाच्या अलिप्ततेने चाललेले मंत्रोच्चारण
पोपटाच्या डोळ्याच्या जागी आकडा दक्षिणेचा
दक्षिणेश्वरा,या साऱ्यात उगाच शोधत होतो
एखादा अश्रू दुःखाचा
ज्याची आठवण पुरली असती अज्ञाताच्या प्रवासाला
तोच एक पाश, एक मोह होता शेवटचा
आता मी मुक्त आहे
कावळ्यांनो, पंगत वाढली आहे - लाजू नका

दुःख नाही वादळाचे, धर्म ते त्याचा निभावे
नांगराने घात केला, नाव घेई हेलकावे

माणसांचे काय इतके घेवुनी बसलास वेड्या
सोबती जन्मांतरीचे साथ देणारे दुरावे

एक रस्ता, दोन फाटे, तू फुलांचा माग घ्यावा
आग्रही काट्याकुट्यांचे मी निमंत्रण आदरावे

देहवीणेला गवसणी घालणारा शिशिर येता
चेहऱ्यावर चोपडावे का वसंताचे गिलावे

कोसते इंद्रायणीला कोरडी गाथा तुक्याची
का कपाटे भूषवाया मी तुझ्या पृष्ठी तरावे

आरत्या ओवाळल्या अन् दगड-धोंडे देव केले
काय कामाचे अम्हाला तत्त्वज्ञानी बारकावे

मीलनाचा आपल्या क्षण का असे मिंधा तिथीचा
सागराची साथ देता का नदीने बावरावे

लाजण्याचा उंच किल्ला, रोजची माझी चढाई
संयमाचे बुरुज आता एकदाचे शरण यावे

ये सखे आच्छाद मजला, प्रीतिचा वर्षाव कर तू
होवुनी आषाढझड ये, फक्त रिमझिम आग लावे

सावल्याही लांबल्या, जवळी जरा ये साजणी
आपल्यासाठीच अस्ताला निघाला दिनमणी

सांज आली, देह व्योमाचा पुन्हा शृंगारला
कोर चंद्राची कपाळी, तारकांचा तनमणी

अंबराचा सोनचाफा संधिकाली उमलला
नाहली रश्मित मुग्धा हेमकांती चांदणी

रात्र झाली तरुण अन् गगनासही आला पदर
ल्यायले आकाशगंगेच्या जरीची पैठणी

सांगता साऱ्या सुखांची होवु दे रात्रीत ह्या
फार केली जीवनी मी वंचनांची मोजणी

घाव जो देऊन गेली दोन वाक्यातून ती
लागला वर्मी न इतका एकही समरांगणी

"भृंग मज विसरून जा अन् शोध दुसरी पंकजा
उपवनी दुसऱ्या असे उदईक माझी रोपणी"



काळोख मातला होता, बेहोष चांदणी होती
ना दोष सर्वथा माझा, ती वेळ निसरडी होती

हो, सभ्य रीत, मर्यादा, लंघून काल मी गेलो
झाला प्रमाद हा माझा, पण रेष पुसटशी होती

नाकारले कितीही तू, तुज भावली धिटाई ती
ओठात लाजरी, लटकी तक्रार कालची होती

ना झुळुक एक वाऱ्याची, ना थेंब पावसाचाही
स्मरणातली तुझ्या-माझ्या पण रात्र वादळी होती

झाली पहाट केव्हा ते कलिके तुला न कळले पण
न्हाली दवात अंगाची एकेक पाकळी होती

ओल्या उन्हात प्राचीच्या लावण्य पहुडले होते
तनबाग डवरली होती, भ्रमरांस पर्वणी होती

अंगावरील हा काटा, हा देह पीस झालेला
येऊन सखा गेल्याची ही साक्ष बोलकी होती

होता पहाट पृथ्वीच्या अंगावरून ओलेत्या
होते धुके उतरलेले की लाज ओढली होती

डोळ्यांस, भृंग, साकीच्या देऊ नकोस तू डोळा
सारी नशा वयाची त्या चषकांत उतरली होती

ऊर तेच, काहूर वेगळे
भांग तोच, सिंदूर वेगळे

गीत तेच पण सूर वेगळे
आज प्रीतिचे नूर वेगळे

धुंद ना जुनी मीलनातली
लग्न भिन्न, म्होतूर वेगळे

तीच मागणी उत्कटतेची
होणारे आतूर वेगळे

तरुणपणाच्या आरशातुनी
प्रतिबिंबाचे नूर वेगळे

एकटे जगी दु:ख नेहमी
सौख्य-सोबती दूर, वेगळे

तीच दौड अन् त्याच शर्यती
रक्तमाखले खूर वेगळे

देह तोच अन् तीच आग मग
पेटता कसे धूर वेगळे ?

Newer Posts Older Posts Home