Blogger Template by Blogcrowds.

मखरात लौकिकाच्या पळभर विराजतो मी

डोहात विस्मृतीच्या नंतर विसर्जतो मी


 

शून्यात गीत गातो, शून्यात साद देतो

विमनस्कतेत हृदयी शून्यात पाहतो मी


माझा मलाच नेतो मी फरपटत सभेला


वसने रुधिर मनाची काव्यात फेडतो मी



पठडीतल्याच ओळी अन्‌ कल्पना जुनेर्‍या


अवचित कधीतरी पण प्रतिभेस गाठतो मी



सांगू नये असेही पोटात खूप असते


बोलून जीभ माझी तरिही विटाळतो मी



विहिरीत बिंब माझे की पाणसर्प आहे ?


नि:श्वास सोडतो की फुत्कार टाकतो मी ?


देईन जलसमाधी 'भृंगा' कधीतरी मी


दुसर्‍या कुणास कोठे पाण्यात पाहतो मी ?

विहार मानू नकोस, आहे ठरीव चौकट, ठरीव वावर

कुणीतरी वेगळाच मांडून चालवी सोंगट्या पटावर



कुठून पडले जुन्या स्मृतींचे गुलाबपाणी तनामनावर

उगाच कोमेजल्या क्षणांना खलून शिंपण कलेवरावर 



गळून गेलीत सर्व पाने, जळून गेलेत सर्व मोहर

लतारुपी बांडगूळ पण आजही तरारे तरूवरावर



अधीर आहे तुझ्या मिठीच्या उबेत सर्वस्व जाळण्या मी

अखेरची मुक्ति दे मला तू पडून, विद्युल्लते, शिरावर



अता तरी हा उठेल का ह्या मनावरीचा निराश वेढा

पराभवाशी समेट केला, करून झाल्या सह्या तहावर 



सबूर, केव्हातरी तुझ्याही कुणीतरी गुणगुणेल ओळी

म्हणेल, "होता बरा कवी हा, नसेल ग़ालिब, नसेल खावर"

नका खुणेने मला बोलवू रंगमहाली होउ‌न आतुर
करिन मागणी पूरी तुमची, धीर धरा, सजणा, घटकाभर ||धृ||


ओठांवरची अमृतभरती
उधळिन, सखया, तुमच्यावरती
हक्काची मी तुमची गरती
धसमुसळेपण कशास, राया, चांदण्यात न्हाउ‌या रातभर ||१||


आवेगाला जरा आवरा
ढासळलेला तोल सावरा
नका छळू, जाउ‌ द्या दिलवरा
चंद्र-चांदण्या मातू लागता भरुन काढुया सर्व कसर ||२||


तुम्हीच सांगा कशि येउ‌ मी
सर्वांदेखत जवळ वाहु मी
कुणाकुणाची नजर टाळु मी
कसा फुलावा दिवस-उजेडी रातराणीचा मदीर मोहर ||३||


किणकिणती बांधली कंकणे
रुमझुमती उतरली नूपुरे
परि गात्रांची तार रुणझुणे
फिरू लागता तव नजरेचे मोरपीस अलगद अंगावर ||४||


गुपित सांगते तुम्हास राया
छेड न तुमची जायी वाया
आतुरली, मोहरली काया
मिठीत घ्या, मी तुम्हा लावते देहफुलाचे मादक अत्तर ||५||


अता काहिली सोसत नाही
रुसवे-फुगवे सोडा, बाई
नका हातचे राखू काही
तटतटणार्‍या भर ज्वानीची मदार तुमच्याविन कोणावर ? ||६||

Newer Posts Older Posts Home