Blogger Template by Blogcrowds.

नका खुणेने मला बोलवू रंगमहाली होउ‌न आतुर
करिन मागणी पूरी तुमची, धीर धरा, सजणा, घटकाभर ||धृ||


ओठांवरची अमृतभरती
उधळिन, सखया, तुमच्यावरती
हक्काची मी तुमची गरती
धसमुसळेपण कशास, राया, चांदण्यात न्हाउ‌या रातभर ||१||


आवेगाला जरा आवरा
ढासळलेला तोल सावरा
नका छळू, जाउ‌ द्या दिलवरा
चंद्र-चांदण्या मातू लागता भरुन काढुया सर्व कसर ||२||


तुम्हीच सांगा कशि येउ‌ मी
सर्वांदेखत जवळ वाहु मी
कुणाकुणाची नजर टाळु मी
कसा फुलावा दिवस-उजेडी रातराणीचा मदीर मोहर ||३||


किणकिणती बांधली कंकणे
रुमझुमती उतरली नूपुरे
परि गात्रांची तार रुणझुणे
फिरू लागता तव नजरेचे मोरपीस अलगद अंगावर ||४||


गुपित सांगते तुम्हास राया
छेड न तुमची जायी वाया
आतुरली, मोहरली काया
मिठीत घ्या, मी तुम्हा लावते देहफुलाचे मादक अत्तर ||५||


अता काहिली सोसत नाही
रुसवे-फुगवे सोडा, बाई
नका हातचे राखू काही
तटतटणार्‍या भर ज्वानीची मदार तुमच्याविन कोणावर ? ||६||

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home