कसे म्हणू की हलके झाले भार दिसांचे ?
सुरूच मरणोत्तरही जर उपचार दिसांचे ?
उदासवाण्या रात्रींचे, बेजार दिसांचे
युगे युगे एकाकीपण, शृंगार दिसांचे
नकोस विसरू हुंदडताना, बागडताना
जिवा, किती छोटे आहे आवार दिसांचे
पदर जरा ढळता रात्रीचा हादरलो मी
अध:पतन कैसे व्हावे स्वीकार दिसांचे ?
निशांत होण्याचे लक्षण कोठून दिसावे ?
चहूकडे भरले मायाबाजार दिसांचे
"दिव्या, दिव्या दीपत्कारा"सम सहज नसे ते
उजळुन जाणे शब्दांनी अंधार दिसांचे
कशास घाई, संध्या-छाया स्पष्ट दिसू द्या
निवांत काढू तेव्हा सारासार दिसांचे
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
शामरंगी रंगली ती शुद्ध हे किटाळ आहे
गौळणिंनो, रंग राधेचा किती दुधाळ आहे
चेहर्यावर ओढणीचा ठेवते खडा पहारा
हाय! अधरामृत तिचे अद्याप वस्त्रगाळ आहे
पारिजाताच्या सड्याची नर्तनास दाद गेली
(त्यास पायी तुडवणार्या पावलात चाळ आहे)
गंध अर्धोन्मीलितेचा वेड लावतो जिवाला
की उशाशी मोगर्याची विस्कटून माळ आहे ?
फुंकरीने शांत कर, वा ये मिठीत, हो समीधा
पेटलेला गार वार्याने अनंग जाळ आहे
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
प्रेरणे, देऊ तुला चावी कशी ?
पूर्णता कवितेस लाभावी कशी ?
स्वच्छ कागद गाठतो शत्रूपरी
अक्षरांची खिंड लढवावी कशी ?
वादळी लाटांप्रमाणे कल्पना
शब्दनौका त्यात हाकावी कशी ?
काय वांझोट्या विचारांचे करू ?
लेखणीची कूस उजवावी कशी ?
नांगरूही वाळवंटाला अम्ही
अमृताची धार वर्षावी कशी ?
आतला लेखक कधीचा संपला
शारदेची अर्चना व्हावी कशी ?
मूक हो अन् वैखरीला दे रजा
हाक कानी त्याविना यावी कशी ?
Labels: कविता
