रात्र पडता तेज ज्याचे लुप्त होते
लोक असल्या भास्कराचे भक्त होते
देवळाबाहेर रांगा लांब होत्या
देव गाभार्यातले निद्रिस्त होते
फायदा-नुकसान काटेकोर ज्यांचे
पाप-पुण्याचेच खाते व्यस्त होते
एवढ्या उच्चारवाने घोषणा का ?
लागले डोलू कुणाचे तक्त होते ?
वेचले, मग फेकले, तुडवून गेली
भासले माझे हृदय प्राजक्त होते
अर्थ काही वेगळा होता स्मिताचा
वेदनेने नेत्र ओले लिप्त होते
का विटाळू मांडुनी शब्दांत त्याला
अंतरी जे आजवर अव्यक्त होते ?
गीत-गझला दोन घटकांचेच रंजन
दीपिका होते अमर, वा सूक्त होते
सोसतो गर्भारशीसम रोज वेणा
काव्यसंभव का कधी परहस्त होते ?
काय सृजनावाचुनी अडले कुणाचे
प्रजननाने जर अहम् अभिव्यक्त होते ?
एक तर रद्दीत जाते काव्य सारे
फार धगधगलेच तर ते जप्त होते
कल्पना घाली मिठी काव्यास ऐसी
अर्थ शब्दांवर जणू अनुरक्त होते
काव्यमय शृंगार की क्रांती-तुतारी ?
चेतले जे आजवर संन्यस्त होते !
अनुभवांती वाटते, चुकलेच माझे
खूप लिहिले, मात्र ते बेशिस्त होते
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
अंतरी जे आजवर अव्यक्त होते ?
वा! सगळीच गज़ल उल्लेखनीय आहे, पण त्यातल्या त्यात ही द्विपदी खूपच खास!