कधी कधी शब्दांनाही मोकळे असू द्या
उगाच बेड्या चरणांना घालता कशाला ?
नकोत छंदांच्या गाठी, मोकळे असू द्या
पहा किती काव्याचे शेवाळले सरोवर
खळाळती ठेवा वाणी; मोकळे असू द्या
दिसून यावा सर्वांना चेहरा कवीचा
असे कवन आरस्पानी, मोकळे असू द्या
असो मुखी यवनी वा गीर्वाण शब्दगंगा
हृदय मराठीच्यासाठी मोकळे असू द्या
Labels: कविता
ते कुणाचे शब्द होते? ते कुणाचे सूर होते?
2 comments Posted by Milind Phanse at Friday, December 25, 2009ते कुणाचे शब्द होते? ते कुणाचे सूर होते?
अंतरी वस्तीस होते, अन् तरीही दूर होते
हे कसे वात्सल्य ज्याचा कोरडा असतो उमाळा?
राहिले पान्हावण्याचे ते अभागी ऊर होते
मी प्रवाहाच्या बरोबर वाहण्याचे काम केले
पैलतीरी पोचण्याइतके कुठे मगदूर होते?
लक्ष योनींचा पसारा, ह्या फुकाच्या येरझारा
जन्म-मरणाचीच चिंता, मोक्ष मिळणे दूर होते
’भृंग’, नाभीकमळ शोधू , ती मिठी असते चिरंतन
बाप, आई, मित्र, पत्नी; सर्व क्षणभंगूर होते...
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
मोहाची फुले, मोहाचे घोट
जीवनात ओतप्रोत
पण आम्ही
हुंगणार नाही, पिणार नाही
मचूळ पाण्याशिवाय काही
कारण आम्हाला मिळाले आहेत
नेभळट, पांढरपेशे संस्कार; अन्
"साधी राहणी,उच्च विचारसरणी" सारख्या सुभाषितांची अफू
तिचे व्यसन जडले की मागून येतात
"अंथरूण पाहून पाय पसरावे",
"बिकट वाट वहिवाट नसावी"
ह्या तिच्या बहिणी
ज्यांनी नासवल्या मध्यमवर्गियांच्या कित्येक पिढ्या
"समाजाची धुरा तुमच्यावर आहे" ही लोणकढी ठोकून
जगण्याच्या आनंदास पाप ठरवले
आणि दारिद्र्यास लावल्या उदात्ततेच्या झालरी
नीतिमत्तेच्या आनुवंशिक क्षयरोगाला कवटाळून बसतो आम्ही
छोट्या छोट्या लबाड्या करतानाही
(कारण दरोडा घालण्याची हिंमत नाही)
अजून किती काळ बसणार आहोत कुरतडत
न झेपणार्या नैतिकतेचे पाश,
त्यांचेच गोडवे गात ?
Labels: कविता बॉंबस्फोट
