भावनांच्या पुस्तकाला मागणीचा पेच येथे
देह चाळाया जनांची मात्र रस्सीखेच येथे
रोजचे संवाद आणिक रोजच्या अनिवार्य जखमा
शब्दठिकऱ्या नेहमीच्या, नेहमीची ठेच येथे
मी अगस्तीसम कधीचा क्षार पाणी पीत आहे
का तरीही डोळियांचे डोह भरलेलेच येथे?
यत्न मी आजन्म केला माणसांशी बोलण्याचा
मी तरी होतो मुका वा भोवती बहिरेच येथे!
मयसभा विद्वज्जनांची, काय त्यांचा रंग सांगू
कुंपणावर बैसलेले मान्यवर सरडेच येथे
फूल घे समजून त्यांना, हे तुझ्या आहे भल्याचे
जी मऊ दगडाहुनी ती वीट 'भृंगा' वेच येथे
Labels: गझल
1 Comment:
Subscribe to:
Post Comments (Atom)
का तरीही डोळियांचे डोह भरलेलेच येथे?
सुंदर! गझल आवडली.