देहाचे सोने झाले, देहाची माती झाली
कैद्यास तमा ना त्याची, त्याची तर मुक्ती झाली
जे उरले मागे त्याचे ना खंत तया ना खेद
अन् तरी माणसे जमुनी का दु:खी-कष्टी झाली?
पाहे ना वळुनी मागे, ही फिकिर तयाला नाही
मागे उरल्या वसनांची कितवी आवृत्ती झाली
तो प्रवास करण्या निघता सोबत घेई ना कोणा
ती कशी रुचावी, ती तर कायिक आसक्ती झाली
योनींशी लाखो त्याचे संबंध निकटचे आले
गात्रांच्या संयोगाने त्याची ना तृप्ती झाली
संगमोत्सुकाची आहे वेडी आशा मोक्षाची
गुणहीन अरूपाशी ना अद्याप समष्टी झाली
Labels: कविता
0 Comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)