दूर एक समुद्र-किनारा
सागराची नितळ निळाई
सोनेरी, स्वच्छ, मऊशार वाळू
एकांत, आणि अशी अवर्णनीय शांतता
जिला अधोरेखित करते लाटांची अंगाई
एक निवांत बेट
अल्पजीवी आणि त्यामुळेच अधिक रमणीय, सुंदर
स्वर्गाचा एक लहानसा तुकडा
फक्त माझा
जिथे देवालाही मज्जाव आहे
कारण तोही माझे चित्त विचलीत करेल
शक्य तोवर घेऊ दे मला भोग या स्वर्गाचा
फार काळ जगास दूर ठेवता येणार नाही...
Labels: कविता
भावनांच्या पुस्तकाला मागणीचा पेच येथे
देह चाळाया जनांची मात्र रस्सीखेच येथे
रोजचे संवाद आणिक रोजच्या अनिवार्य जखमा
शब्दठिकऱ्या नेहमीच्या, नेहमीची ठेच येथे
मी अगस्तीसम कधीचा क्षार पाणी पीत आहे
का तरीही डोळियांचे डोह भरलेलेच येथे?
यत्न मी आजन्म केला माणसांशी बोलण्याचा
मी तरी होतो मुका वा भोवती बहिरेच येथे!
मयसभा विद्वज्जनांची, काय त्यांचा रंग सांगू
कुंपणावर बैसलेले मान्यवर सरडेच येथे
फूल घे समजून त्यांना, हे तुझ्या आहे भल्याचे
जी मऊ दगडाहुनी ती वीट 'भृंगा' वेच येथे
Labels: गझल
देहाचे सोने झाले, देहाची माती झाली
कैद्यास तमा ना त्याची, त्याची तर मुक्ती झाली
जे उरले मागे त्याचे ना खंत तया ना खेद
अन् तरी माणसे जमुनी का दु:खी-कष्टी झाली?
पाहे ना वळुनी मागे, ही फिकिर तयाला नाही
मागे उरल्या वसनांची कितवी आवृत्ती झाली
तो प्रवास करण्या निघता सोबत घेई ना कोणा
ती कशी रुचावी, ती तर कायिक आसक्ती झाली
योनींशी लाखो त्याचे संबंध निकटचे आले
गात्रांच्या संयोगाने त्याची ना तृप्ती झाली
संगमोत्सुकाची आहे वेडी आशा मोक्षाची
गुणहीन अरूपाशी ना अद्याप समष्टी झाली
Labels: कविता
