Blogger Template by Blogcrowds.

गझल

समजून रावणाला घ्या, असुरजात होता
वरदानदोष थोडा परमेश्वरात होता

हृदयात मारुतीच्या बघतो स्वत:स राघव
सीते, तुझ्याच वेळी का संभ्रमात होता ?

जे पुण्य जोडले मी त्याच्याच जर कृपेने
पतनात काय माझ्या त्याचा न हात होता ?

वाजे न एकहाती टाळी जगी कधीही
नारीत दोष थोडा, थोडा नरात होता

दररोज प्रश्न पडतो मज फूल वेचताना
कुठल्या सवत-सुभ्याचा* हा पारिजात होता ?

साशंक ऐकले मी आदेश प्रेषिताचे
हेतू खरा तयाचा अवगुंठनात आहे

युद्धास अंत नसतो, इतिहास साक्ष होता
पुढल्या समरबिजाचा अंकुर तहात होता

दिसतात खुरटलेली येथे अनेक रोपं
वडसावलीत कोणी, कोणी उन्हात होता

पाहून भैरवीला ज्याचा न ताल चुकला
त्याच्याच मैफिलीचा शेवट सुरात होता

चरणी, प्रभो, तुझ्या तो सुमनात 'भृंग' आला
शोधात कमलिनीच्या जो कर्दमात होता


* - ही टंकलेखनाची चूक नाही. मला 'सवतासुभा' नाही, 'सवत-सुभा' असेच म्हणायचे आहे.

2 Comments:

  1. Anonymous said...
    हृदयात मारुतीच्या बघतो स्वत:स राघव
    सीते, तुझ्याच वेळी का संभ्रमात होता ?

    atishay chaan... mala nehami haach prashna padto..
    abhijit said...
    हृदयात मारुतीच्या बघतो स्वत:स राघव
    सीते, तुझ्याच वेळी का संभ्रमात होता ?


    wahhhh...

Post a Comment



Newer Post Older Post Home