जन्म घेता ऊर मागे, स्कंध अंती चार मागे
अडचणीला हात मागे, मैथुनाला साथ मागे
ओढणीचा शेव मागे, पूजण्याला देव मागे
नर्तकींचा बार मागे, वर सुखी संसार मागे
न्याय मागे चार साक्षी, धर्म कंठी हार मागे
सूत्र मंगळ बायको अन् जडजवाहिर जार मागे
शुद्ध बैलोबा पती पण मर्द, बांका यार मागे
वागणे व्यवहार मागे, भिंत पण सुविचार मागे,
हार मिळतो त्या गळ्याला जो खरा तलवार मागे
माणसांचे काय, अमुचा देवही सत्कार मागे
वेद हिंदू चार मागे आणि गीतासार मागे
बांग देणारा मुअझ्झिन उंच ते मीनार मागे
धर्मयुद्धाची तुतारी नेहमी अविचार मागे
धर्म तो संस्थापण्याला कृष्णही संहार मागे
मागण्याची लाज कसली, मागणे हा हक्क आहे
मीच संकोचून का मग राहिलो नादार मागे?
Labels: कविता
0 Comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)