Blogger Template by Blogcrowds.

विझल्या कालांतराने पोरक्या मशाली
कालचा कार्यकर्ता पुन्हा बने मवाली

विरल्या हवेत फ़सव्या घोषणा कधीच्या
पुनश्च लोक आता ईश्वराच्या हवाली

ल्यालें राजवस्त्रें ते गावगुंड सारे
जनता- जनार्दनाला ही लक्तरें मिळाली

उजवें अथवा डावें , भगवें वा निधर्मी
कोणी पुसें न आता दीनांची खुशाली

आपापल्या दु:खाचा वाहतो भार जो तो
चुकली कुणास येथे ही रोजची हमाली

मागेल भाव साचे, देशील का तयाला ?
तू ऒठ अमृताचे देशील का तयाला ?

वाहे मलूल वारा शोधात चेतनेच्या
निश्वास चंदनाचे देशील का तयाला ?

ठरवूनही न शकले जो प्रश्न मी विचारू
हुंकार उत्तराचे देशील का तयाला ?

दारात थांबलेले पाऊल बावरोनी
तू माप तांदळाचे देशील का तयाला ?

आहे तृषार्त माती, वैशाख सोसवेना
शिडकाव जीवनाचे देशील का तयाला ?

ही चर्चा इथे स्थलांतरित करण्यात आली आहे. कृपया लिंकवर टिचकी मारून भेट द्यावी. तसदीबद्दल क्षमस्व.

इतकी हसू नको की येतील आसवे
येईल वेळ तेव्हा नसतील आसवे

सांभाळ, चंदनाचे वय लागले तुला
नागांपरी इथेही असतील आसवे

रुजवू नकोस अंकुर ह्रदयात प्रीतिचा
बागेत प्रीतीच्याही पिकतील आसवे

पुसतात काजळाला दररोज जी तुझ्या
माझे कधी कुशल का पुसतील आसवे

राहो न अंतरीचे ते गूज अंतरी
ह्रदयातले मुखावर लिहितील आसवे

करतील सैनिकांचे स्वागत सुवासिनी
कुंकू कुणाकुणाचे पुसतील आसवे ?

ठरतात सांत्वनाला जे शब्द कोरडे
त्यांच्यात स्निग्ध माया भरतील आसवे

कित्येक 'भृंग' येती मकरंद चाखण्या
कोणी तरी कधी का टिपतील आसवे ?

लढून मेले देशासाठी
हौतात्म्य ज्यांनी पत्करले
विटंबना ही किती करावी
निर्मम त्यांच्या बलिदानाची

तत्त्वांची लक्तरे जाहली
देशभक्तिचे मोल न उरले
त्यागाच्या का मारीत गप्पा
अभिलाषा सर्वोच्च पदाची

शर्विलकांची झाली दाटी
प्रामाणिक पेन्शनीत गेले
जनसेवेच्या नावाखाली
लूटमार सत्ताधार्‍यांची

रयत जिथल्या तिथे बापुडी
राजकारणी गब्बर झाले
काय वेगळी कथा याहुनी
यवनांची अथवा गोर्‍यांची

पक्षांची ही बजबजपूरी
जाहिरनाम्य़ांचा कोलाहल
कुणी न वाली देशा आता
लाज न कोणा जना-मनाची

निवडणुकांचा वग रंगतो
गण-गवळण अन बतावणीचा
अस्वल झालो सारे आपण
चलती असल्या दरवेशांची

लोकशाहीची कोरी पाटी
लोकही आता निबर जाहले
लिलाव हा मांडती मतांचा
झोकुनिया पहिल्या धारेची

कुठून केले प्रयाण आपण
भरकटून हे कुठे पोचलो
लोकराज्य कल्पनेत उरले
सत्ता खाकी अन खादीची

कुठे लोपली स्वप्ने सारी
का कोसळले सारे इमले
वेश्येच्या वस्त्रांसम गळली
तटबंदी नीतीमूल्यांची

Newer Posts Older Posts Home