Blogger Template by Blogcrowds.

जय हिंद

लढून मेले देशासाठी
हौतात्म्य ज्यांनी पत्करले
विटंबना ही किती करावी
निर्मम त्यांच्या बलिदानाची

तत्त्वांची लक्तरे जाहली
देशभक्तिचे मोल न उरले
त्यागाच्या का मारीत गप्पा
अभिलाषा सर्वोच्च पदाची

शर्विलकांची झाली दाटी
प्रामाणिक पेन्शनीत गेले
जनसेवेच्या नावाखाली
लूटमार सत्ताधार्‍यांची

रयत जिथल्या तिथे बापुडी
राजकारणी गब्बर झाले
काय वेगळी कथा याहुनी
यवनांची अथवा गोर्‍यांची

पक्षांची ही बजबजपूरी
जाहिरनाम्य़ांचा कोलाहल
कुणी न वाली देशा आता
लाज न कोणा जना-मनाची

निवडणुकांचा वग रंगतो
गण-गवळण अन बतावणीचा
अस्वल झालो सारे आपण
चलती असल्या दरवेशांची

लोकशाहीची कोरी पाटी
लोकही आता निबर जाहले
लिलाव हा मांडती मतांचा
झोकुनिया पहिल्या धारेची

कुठून केले प्रयाण आपण
भरकटून हे कुठे पोचलो
लोकराज्य कल्पनेत उरले
सत्ता खाकी अन खादीची

कुठे लोपली स्वप्ने सारी
का कोसळले सारे इमले
वेश्येच्या वस्त्रांसम गळली
तटबंदी नीतीमूल्यांची

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home