Blogger Template by Blogcrowds.

भिकारी

कर्णासमोर इंद्र, विष्णू बळीसमोरी
पसरून हात ठरले स्वर्गातले भिकारी

विन्मुख असून वाली का मारलेस त्याला
योद्धा असून रामा ठरलास तू शिकारी

लाक्षागृहात जळली भिल्लीण, पाच पोरं
का जाब पांडवांना कोणीच ना विचारी

अवतार तो खरा जो खलमर्दनाकरीता
वधलेस बालकांना का सांग परशुधारी

पत्नी पणास लावी तो धर्मराज म्हणवे
चवल्या हरून आम्ही ठरतो बरे जुगारी

4 Comments:

  1. Gayatri said...
    नमस्कार मिलिंद. तुमच्या कविता वाचणं हा एक झकास अनुभव असतो. अचूक वृत्तं, सुंदर लय , नेमके शब्द आणि या सर्वांहून महत्त्वाचं म्हणजे प्रगल्भ विचार. ही गज़ल विचाराच्या दृष्टीने सुरेखच!
    'विन्मुख..' ही ओळ लयीत थोडी गोंधळली आहे का?
    Milind Phanse said...
    गायत्री,
    अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार. ह्या कवितेचा लघू-गुरू क्रम
    गा गा ल गा ल गा गा । गा गा ल गा ल गा गा॥ असा आहे. त्यात ही ओळ खालीलप्रमाणे बसते असे मला वाटते :
    वि न्मुख अ सू न वा ली । का मा र ले स त्या ला ॥
    वि ह्रस्व असला तरी त्यानंतर आलेल्या जोडाक्षरामुळे उच्चारात गुरू होतो. तसेच पहिल्या ओळीत 'इंद्र'ह्यातील द्र पूर्ण उच्चारला जात असल्यामुळे गुरू होतो. अर्थात हे माझे विश्लेषण. ह्यात काही चूक दिसली तर जरूर कळवा म्हणजे मला योग्य त्या सुधारणा करता येतील.
    क. लो. अ.
    -मिलिंद
    Gayatri said...
    तुमचं विश्लेषण एकदम बरोबर आहे! मी ग-ल क्रम मात्रावृत्ताप्रमाणे न लावता अक्षरगणवृत्ताप्रमाणे लावला होता. त्यात 'न्मुख' ही अक्षरे एकत्र घेतली नाहीत - त्यामुळे घोटाळा झाला. मोठ्याने वाचून बघताना लय छान जुळत होती पण वृत्त जुळेना म्हणून शंका उपस्थित केली इतकंच. तुम्ही इतकं सविस्तर समजावून सांगितल्याबद्दल आभार :)

    आणि विन्मुख शब्द त्याच्या जागी किती चपखल बसला आहे. त्या ओळीत अन्यत्र कुठेच बसत नाही तो! 'वालीस पाठमोऱ्या का मारलेस सांग' असली रया घालवणारी तडजोड करावी लागते मग :D

    मुक्तछंदातल्या कविता त्यांच्या सहजतेमुळे छान वाटतातच, पण तुमच्या छंदोबद्ध कवितांमध्येही तशीच सहजता असते, ही गोष्ट फार आवडते.
    Rupesh Talaskar said...
    hi milind ,
    tu hya kavita ek kavi mhanun kelya aahes ? ki hya zakhama aahet vastavatlya ? " सकाळ " sagalyanchyach life madhye hote pan mhanun kahi sagalyanach abhimanyucha ashwatthama zalela janvat nahi ! " व्योमाचे काळेभोर डोळे वाहू लागले
    वाहत राहिले..." pawasla hya rupat sagalech nahi baghu shakat !
    ani ashya baryach ughadya zakhama mala tuzya kaviten madhye disat aahet !
    tu kharach bara aahes ka ?
    mi tuzyatalya sensitive manacha khup adar karto , pan tuzi aswastata mala tuzya kavite madhun tochat aahe ,
    ani jar hya nustya kavita astil
    tar " kavivarya milindana " maza manacha mujara .
    maze likhan far ashudha aahe
    fact bhavana samaz.
    rupesh

Post a Comment



Newer Post Older Post Home