Blogger Template by Blogcrowds.

मी प्रेम करतो बेड्यांवर, साखळ्यांवर...
ज्यांच्या आधाराशिवाय लटपटू लागतील हातपाय
ज्यांची लांबी आखून देते परिघ
माझ्या स्वच्छंदी विहरण्याला
ज्यांचा आश्वासक थंडपणा समजूत घालतो
माझ्या उकळत्या, उतू जाऊ पाहणाऱ्या रक्ताची
आणि पटवतो त्यास महती
आत्ममग्न विवेकाची, सबबींची
कासवाप्रमाणे कवचाआड अंग चोरण्याची

मी प्रेम करतो बेड्यांवर, साखळ्यांवर...
काही भेट मिळाल्या जन्माने, वारसाहक्काने
काही बहाल केल्या शैक्षणिक हिटलरांनी,
घरच्या हुकूमशहांनी
जगाच्या अनुभवांनी
राहिलेली कसर पूर्ण केली
सनईच्या सुरांनी

मी प्रेम करतो बेड्यांवर, साखळ्यांवर...
ज्या वागवायच्या आहेत शेवटच्या श्वासापर्यंत
पांढरपेशा अभिमानाने
उच्च, उदात्त, लेबलं लावून
न्यायाची, नीतीची, तत्त्वांची, मूल्यांची
एक मात्र खरं -
ह्या बेड्या होत्या म्हणून
नाहीतर आयुष्यात एकदा तरी
साला, मीही राडा केला असता !

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home