Blogger Template by Blogcrowds.

संभ्रम

ओढ क्षितिजाची मनाला आवरेना
लक्ष्मणाची मात्र रेषा लंघवेना

साद येते स्पष्ट ती कानी तुझी पण
मीलनाचा मार्ग काही सापडेना

साथ देण्या मी जरी येऊ पाहते
संभ्रमाला साथ माझी सोडवेना

भेटता तू बोलते मी अन्य सारे
नेमके बोलायचे ते बोलवेना

सांज सोनेरी तुझ्यासमवेत जाते
एकटीने काजळ्या रात्री सरेना

मेघ आषाढातला झाले जणू मी
राजसा, डोळ्यातले पाणी खळेना

बंदराला नाव पोहोचेल कैसी
वादळांचे मैत्र जीवा मोडवेना

चांदण्यांनो घ्या जरा तुमच्यात मजला
रोहिणीला मोह चंद्राचा चुकेना

1 Comment:

  1. Anonymous said...
    Too good! All the anxiousness and restlessness has been beautifully captured! Keep writing!

Post a Comment



Newer Post Older Post Home