Blogger Template by Blogcrowds.

अर्पण

स्वतःस पावसास अर्पिते
उसासते, धरा सुवासते

छ्चोर सूर्य छेड काढतो
पहाटव्योम लाजलाजते

धुक्यात लोपल्या दिशा जुन्या
नवे क्षितिज मना खुणावते

पथिक अजून थांबला कुठे
थकून वाट का विसावते

शिखर असो सुरम्य साजिरे
वसावया दरीच लागते

चढून उंच डोंगरावरी
पठार काय ध्येय साधते

निजे उशास स्वप्न घेउनी
कवेतले गुलाब उमलते

जळात मी असून कोरडा
सरस्वती उगीच वाहते

दुधाळ पौर्णिमेपरी कुणी
मिठीत चांदणी प्रकाशते

1 Comment:

  1. Anonymous said...
    मिलिंद,

    कविता सुंदरच जमली आहे. सगळीच कडवी चांगली आहेत. अशा अजून येऊ द्यात की!

Post a Comment



Newer Post Older Post Home