Blogger Template by Blogcrowds.

२६ जुलै २००५ ला आभाळ फाटले. मुंबई शहर कमी व जलाशय अधिक भासू लागली. एका महानगरात काही तासांच्या पावसाने १०००च्या आसपास बळी घेतले. नाही, चुकलो. बळी पावसाने नाही, वर्षानुवर्षे झोपा काढणाऱ्या, सामान्य नागरिकांच्या सुखदु:खाशी काहीही देणेघेणे नसलेल्या राजकारण्यांनी आणि नोकरशहांनी घेतला. खापर मात्र पावसावर फुटलं. त्या दिवसाच्या अनुभवातून स्फुरलेल्या ह्या काही ओळी.

निष्चेष्ट पडलेली धरा
विवस्त्र, विटंबित देहावर ओढून
आकाशकाळोखीची चादर
एके काळच्या उन्मत्त, बेफाम सरिता
बुजवल्या, बुजल्या, बुजऱ्या झाल्या
निपचित पडून आपल्यात सामावत गेल्या
गाळ माणसांचा
दलदलीच्या खोल मांड्यांमध्ये उभी राहिली
एक नवी मयसभा
बिचाऱ्या मिठीला जिने
आपल्या मगरमिठीत आवळून टाकले
आक्रोश करू लागले आकाश
बलात्कारित सखीची पाहून अवस्था
व्योमाचे काळेभोर डोळे वाहू लागले
वाहत राहिले...

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home