Blogger Template by Blogcrowds.

कोहम्?

द्युतामध्ये रमलो नाही
शकुनी होऊ शकलो नाही

फासे फिरले, वासे फिरले
पडझड झाली, खचलो नाही

हाती उरल्या जीवन-निष्ठा
एक तेव्हढे हरलो नाही

काट्यांनो या सोबत माझ्या
दोस्त जुने विस्मरलो नाही

लुकलुकता मी क्षीण काजवा
मार्तंडांना रुचलो नाही

आतुर माती सुजला, सुफला
मीच करंटा रुजलो नाही

कशी कुणाची सेवा घेऊ
चंदन होऊन झिजलो नाही

पाय घसरले भल्याभल्यांचे
मीच एकटा चळलो नाही

काय घाबरू यमदूताला
जगण्याला जर डरलो नाही

काय तुम्हाला ओळख देऊ
मलाच मी जर कळलो नाही

1 Comment:

Post a CommentNewer Post Older Post Home