Blogger Template by Blogcrowds.

शब्द

शब्द कोशात होते

स्फटिकाप्रमाणे निर्मळ, पारदर्शी;

शाळकरी वहीत होते

सुवाच्य, सुबोध, सुविहित;

प्रेमिकांच्या ओठी होते

गोड, स्निग्ध;

भांडणात होते धारदार,

कधी कचकचीत शिवी होऊन.


मनाच्या सप्तपाताळात

लुप्त सरस्वतीचा शोध घेण्याच्या भगीरथ प्रयत्नात

माझी छाया पडली त्यांच्यावर,

आणि शब्द काळवंडले,

छटांना नादावले;

परावर्तित करू लागले हातात आल्यासारख्या भासणार्‍या मासोळ्यांना.

नेम चुकू लागला

अर्थासाठी जाळे टाकून बसलेल्या धीवरांचा

--की राहिला नाही शब्दांचा?


निसटताहेत ते हातून

तेलाने माखलेल्या मल्लांसारखे,

मला अस्मान दाखवून.

आणि विजयोन्मादात

उतरताहेत कागदावर करड्या रंगात,

कृष्ण-धवलाच्या जुन्या काटेकोर मर्यादा झुगारून.


हा त्यांचा निसटता विजय

की सौकर्याचा घोर पराजय?

ही दुविधा ग्रासते

अंतिम टप्प्यातल्या कर्करोगाप्रमाणे

ओळी-ओळीला.


आणि मी होतो - नि:शब्द.

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home