Blogger Template by Blogcrowds

कळ्यांना जागवूनी बोलले दव

"उरे दो-चार घटकांचेच शैशव"



प्रिये, तोरा गुलाबाचा असावा


नि मोहाच्या फुलांचे धुंद आसव



अता उमलावयाची वेळ झाली


सख्याचे नादती बागेत पदरव



मधाचे बोट आता खूप झाले


उधाणू दे मधाचा मत्त अर्णव



दवाचा स्पर्श अन्‌ चुंबन अलीचे


कळी खुलते नि घडतो संगमोत्सव



धुक्याच्या चादरीने फूल झाकी


जणू उन्मीलितेचे तृप्त सौष्ठव



जराही ना दुखवता फूल खुडणे


असे याहून काही हस्तलाघव ?



किती, 'भृंगा', तुझी, रे, दांडगाई


अशा वेळी हवे रेशीम मार्दव
...

धूप

लुप्त होत चाललीत तीर्थरूप माणसे 

जाळती स्वत:स जी बनून धूप माणसे 



देवपद दशांगुळेच राहिले असे जणू 


शोधतात आरशात विश्वरूप माणसे 



रोजचे रटाळ रेटण्या रहाटगाडगे 


आणतात कोठुनी मनी हुरूप माणसे ? 



हक्क-बिक्क सर्व झूट, भूक तेव्हढी खरी 


गात्र भागवा, उदर भरा, नि चूप माणसे 



व्योम त्यांस धार्जिणा, न क्षितिज त्यांस धार्जिणे 


मंडुकांसमान वानतात कूप माणसे 



गर्दभे नि श्वान घेउनी जुलूस काढुया 


मॉल संस्कृतीत जाहली गुडूप माणसे 



सुंभ राहिला न पीळ, राख फक्त राहिली 


लावतात का तरी मिशीस तूप माणसे ? 



अन्नछत्र अन्‌ विहीर रखडती निधीविना 


बांधतात देवळे, मशीद, स्तूप माणसे 



कायद्यानुसार पौर सर्वथा समान पण 


समजतात खूपशी स्वत:स भूप माणसे 



यक्षप्रश्न राहिला अनुत्तरित अखेरचा 


का तळे अजून चाखतात खूप माणसे ? 



कोण तू, मिलिंद, काय पाड ह्या जगी तुझा ? 


रे, भल्याभल्यास घालती न धूप माणसे

Home