Blogger Template by Blogcrowds.

माझ्यातील शब्दांचा पाचोळा
गोळा कर, जाळून टाक.
घालू नकोस सडा
नटरंगी, निरुपयोगी रूपकांचा.
उडून जातो पान उलटेस्तोवर
लक्षणार्थाचा गंध ,
आणि दिमाखात मिरवतो
फुलोरा सकृतदर्शनी शब्दार्थाचा.

निट शोध, सापडतील
अस्थानी, विन्मुख यमके,
जुळू न शकलेल्या नात्यासारखी.
त्यांची तगमग समजून घे.
परिस्थितीने जखडले आहे त्यांना
दोन धृवांवर.
त्यांची समजूत घाल,
आणि हळूच खोडून टाक त्यांना.
कारण ती कृत्रिम आहेत.

वृत्त? होते काल-परवापर्यंत
अंगभर घट्ट लपेटलेले.
फारच काकू-छाप दिसू लागले
तसे फेडून टाकले.
आता उरली आहे अंगावर
लयीची टिचभर बिकिनी.
तीही उतरणे जमेल हळूहळू
आशयाच्या आरस्पानी आविष्कारासाठी.

छ्यॅ! घुसलाच एक अनुप्रास.
बाईप्रमाणेच कवितेलाही
हा अलंकारांचा सोस काही सुटत नाही.

नाही, पण सुटेल, सोडावाच लागेल.
एकदा ठरवलय नं -
संपूर्णपणे विवस्त्र व्हायचं,
प्रतिभेच्या वेणांनी प्रसवलेलं
नैसर्गिक, अनघड लावण्य
निसुगपणे जगासमोर मांडायचं -
भोगण्यासाठी.

त्याशिवाय कवितेला
गती नाही...

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home