Blogger Template by Blogcrowds.

सुरई


श्री. हरिवंशराय बच्चन ह्यांच्या 'मधुबाला' कवितासंग्रहातील 'सुराही' ह्या कवितेचा भावानुवाद.


 


 
  
 
 १.
मी एक सुरई ती हालेची!
मी एक सुरई ती मदिरेची!
मदिरालय माझे मंदिर अन्‌
मदिरा पीणारे चेलेगण,
समजून पुजारी नित धरती
मधु-विक्रेत्याभवती रिंगण;
वाटते अप्सरांसम शोभा
मधुबालांच्या ह्या मालेची.
मी एक सुरई ती हालेची!


२.
कोकिळ-बुलबुल गाती येथे,
घंटारव, अझानही येथे,
जे ऐकुनिया पीणार्‍यांचे
होते आकर्षित चित्त इथे.
द्राक्ष्यांच्या वेलींना येथे
पावनता आहे तुळशीची.
मी एक सुरई ती मदिरेची!


३.
आर्येतर अन्‌ आर्यांसाठी,
दारे उघडी सर्वांसाठी;
मानवतेचे हे मंदिर अन्‌
सार्‍या नर-नारींच्यासाठी.
केवळ मज्जाव तया आहे
मधुतृष्णा सरलेली ज्याची.
मी एक सुरई ती हालेची!


४.
सर्वांना मान समान इथे,
सर्वां वरदान समान इथे,
मी शंभूसम लहरी दाता,
मुक्तीचे सहजी दान इथे;
त्यास्तव आवश्यकता केवळ
माझ्या नखरेल कटाक्षाची.
मी एक सुरई ती मदिरेची!


५.
ह्या मंदिरात पूजन माझे,
अभिवादन-अभिनंदन माझे,
भाग्यावर अपुल्या खुश होती
सारे घेउन दर्शन माझे;
ज्या तपामुळे पोचले इथे
पाहून झलक अन्‌ घ्या त्याची.
मी एक सुरई ती हालेची!


६.
चक्री कुंभाराच्या चढले,
वेलींच्या नक्षीने मढले,
चढविले चितेवर मग मजला,
अग्नीच्या ज्वाळांनी घडले;
जळुनी जरि राख चिता झाली,
मी उरले, जरि मी मातीची.
मी एक सुरई ती मदिरेची!


७.
मी मृत्युंजय झाले आहे,
दैवी महिमा ठरले आहे,
मनुजाच्या नीरस जन्मी मी
अमृतापरी मधुरस आहे.
ह्या एक गुणास्तव मी आत्मा
झाले आहे मधुशालेची.
मी एक सुरई ती हालेची!


८.
मधुने मजला ते नाहविती,
मग प्याले ते मजला दिसती,
माझ्याभवती राहून उभ्या
सुस्वरात मधुबाला गाती;
पूजा ऐसी ह्या भूलोकी
झाली का कुठल्या प्रतिमेची?
मी एक सुरई ती मदिरेची!


९.
मातीची प्रिय दुहिता झाले,
मधु प्राशुनिया तोषित झाले,
चालता घेउनी मधुबाला
झुळझुळता एक झरा झाले,
तो रव ऐकुन पंडित-मुल्ला
विस्मरले रीत चलाखीची.
मी एक सुरई ती हालेची!


१०.
त्यांची मनधरणी का करणे?
का त्यांच्या शापा घाबरणे?
मी स्वये स्वर्ग घेउन फिरता
प्रलयापावेतो का ठरणे?
का उद्या उगेस्तो वाट बघे
कोणी जे आज मिळे त्याची?
मी एक सुरई ती मदिरेची!


११.
मधुबालेच्या खांद्यावरुनी
उपदेश हाच देते चढुनी -
“क्षण-क्षण आयुष्याचा घ्या हो
माझ्या मादकतेने भरुनी;
ह्या क्षणभरच्या गाठी-भेटी,
मग अंतिम यात्रा एकट्याची.”
मी एक सुरई ती हालेची!


१२.
किती अल्प काळ मानव-जीवन,
मग त्यावर का इतके बंधन;
असता जर केवळ मद्येच्छुक,
प्राशू शकता तो सरते क्षण,
ओंजळीतही विरघळु शकते
खाकी वर्दी देहावरची.
मी एक सुरई ती मदिरेची!


१३.
पेल्यांसंगे बैठक जमते,
वाटपात मधुच्या मी रमते,
अगणित मुखात भरते मदिरा,
तरि कमी कधीही नच पडते,
जेथे जेथे फिरते तेथे
आरोळी उठते "दे, दे" ची.
मी एक सुरई ती हालेची!


१४.
जीवन माझे इतरांसाठी,
धुंदी माझी इतरांसाठी,
माझे पीणे आहे सिंचन
ह्या तहानल्या पेल्यांसाठी,
आनंद तयांना अन्‌ माझी
अपयशात भागी हक्काची.
मी एक सुरई ती मदिरेची!


१५.
धुंदित करणे सोपे नाही,
मधुने तृष्णा भागत नाही;
तापांनी उर मम पाझरले,
ही मद्याची धारा नाही!
उर-अश्रुंनी होते केवळ
शांती हृदयातिल ज्वालेची.
मी एक सुरई ती हालेची!


१६.
मधुपान तुम्ही कोठे केले?
निज रक्त तुम्हा मी दान दिले!
उर आक्रंदत होते माझे,
परि तोंडाने गायन केले!
जग ज्याला मम कविता म्हणते
रेखाचित्रे ती पीडेची.
मी एक सुरई ती मदिरेची!

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home