Blogger Template by Blogcrowds.

सरले कवित्व तेव्हा भेटावयास आले 

जे शब्द पांगलेले, ते सांत्वनास आले 



चिरयौवना, चिरायू, स्वैरांगना तरी का 


स्मितहास्य अप्सरेच्या ओठी उदास आले ? 



वाटे हवेहवेसे ते सर्व लाभल्यावर 


का फोल संचिताचे मज प्रत्ययास आले ?



त्या सावळ्या तनूची सुरभि वसंतकाली 


बहरून गंध जैसे नीलोत्पलास आले 


 

आभार अक्षरांचे, ऋण शब्दसंचयाचे 

अवकाश कल्पनांचे बुजवावयास आले 



आजन्म अक्षरांची केल्यावरी मशागत 


कवितेत अर्थ काही अर्थांतरास आले

कसे पंजरी मी शरांच्या निजावे, कुणी पार्थ नाही मला भेटला

कसे घोट भागीरथीचे मिळावे, कुणी पार्थ नाही मला भेटला



सयींचे विषारी किती सर्प माझ्या मनी राहुनी दंश करतात पण


कसे खांडवाने मनाच्या जळावे, कुणी पार्थ नाही मला भेटला



किती शोधले सर्व भावात माझ्या, जगावेगळा सापडे ना कुणी


कसे स्वप्न मी द्रौपदीचे बघावे, कुणी पार्थ नाही मला भेटला



म्हणे एकनिष्ठा, "किती भाग्य माझे, पती मत्सरी लाभला तो मला"


"विभागून घेणे नसे त्यास ठावे; कुणी पार्थ नाही मला भेटला"



तसे घासतो विश्वविद्यालयी रोज खर्डे सुखेनैव प्राध्यापकी


कसे, 'भृंग', अध्याय अठरा रचावे, कुणी पार्थ नाही मला भेटला

हे अबोलीला कधी कळणार नाही

घाव मौनाचा कधी भरणार नाही



का असे फटकून वागावे फुलांनी?


हा ऋतू, हा बहरही ठरणार नाही



तू मला अन्‌ मी तुला आहोत अंती


राग-रुसवा जन्मभर पुरणार नाही



भार दु:खाचा नको देऊस इतका


पापणी झुकुनी पुन्हा उठणार नाही



हुंदक्यांची मालिका चालेल अविरत


जोवरी अधरा अधर भिडणार नाही

Newer Posts Older Posts Home