Blogger Template by Blogcrowds.

किंमत

मी वेचले सुखाचे क्षण दोन-चार अलबत
मोजून जीवनाने केली वसूल किंमत

बसलेत पाठ करुनी माझ्याकडे किनारे
भवसागरात कुठवर हे भरकटेल गलबत ?

प्रेमात काय पडलो, मजनू मला ठरवले
नंतर पुढील सारे घडले परंपरागत

तव लग्नमंडपी मी येऊ जरी न शकलो
नाते अपूर्ण अपुले होते बनून रुखवत

मी दोष काय द्यावा बहिर्‍या जगास जेथे
माझ्याच माणसांना कळले कधी न हृद्गत

ही बांधलीस कैसी तू गाठ, ब्रह्मदेवा ?
सारे दिवे जगाचे झाले तमासवे रत

शिक्षा खुशाल मजला देऊन मोकळे व्हा
कसली सुनावणी अन्‌ न्यायालयीन मसलत

मागिल पिढ्या अम्हाला देऊन बाग गेल्या
यावी कशी फुले पण केल्याविना मशागत

कवितारती असो वा संतप्त शब्दपलिता
अंती विझून जाणे हे एक सत्य शाश्वत


हळव्या, प्रतिभ कवीने येथे जपून गावे
मत-पिंक टाकणारे बसलेत शब्द चघळत

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home