Blogger Template by Blogcrowds.

कधीतरी निवांत मी बसेन जीवनाकडे
कधीतरी तटस्थ मी बघेन जीवनाकडे

म्हणावयास शोधतोय पैलतीर मी जरी
अखेरच्या क्षणी पहा सरेन जीवनाकडे

उगाच श्वास मागुनी नकोस त्यास लाजवू
अजून राहिली नसेल देन जीवनाकडे

भिऊ कशास पाहुणा तुझा बनावयास मी
यमा तुझ्या घरात काय जे जीवनाकडे ?

"शिरावरी तुझ्या असे, मिलिंद, बोज कोणता ?"
मिटून ओठ बोट दाखवेन जीवनाकडे...

भोवती सगळेच जातीचे निघाले
कावळे ते सर्वपित्रीचे निघाले

लाल, भगवे, हात, हिरवे, आणि हत्ती
सर्व उत्सुक राजगादीचे निघाले

लाभता खुर्ची किती जडतात ह्यांना
शासकांचे रोग साथीचे निघाले

जे सभा जिंकून गेले भाषणाने
बाहुले निर्जीव चावीचे निघाले

वासना वृद्धापकाळीही सुटेना
सर्व अनुयायी ययातीचे निघाले

हेच का स्वातंत्र्य ज्यासाठी हजारो
पुत्र फाशी हसत आईचे निघाले ?

सप्त सिंधुंचे नको आणूस पाणी
देवतांचे पाय मातीचे निघाले

(मोह झाला का सवंगाचा तुलाही ?
काव्य करता वाक्य टाळीचे निघाले...)

वाहिन्या म्हणतात
दोनच गोष्टींना बाजारात उठाव आहे
सेक्स आणि मेलोड्रामा
मराठीत पहिलं बाद (आम्ही नाही हो त्यातले!)
निदान दुसरं चालवून बघावं

आज चंगच बांधला
करावा आपल्याही कवितेचा 'रियॅलिटी शो'
सारून बाजूला रोजची सामाजिक बकवास,
आत्मरत मनोविश्लेषण
आणि राजकीय उपरोध

तिलाही नाचायला लावावे
कंबर लचकवत, धपापत्या उरानिशी
अर्थाच्या फालतू वस्त्रांचा करत स्ट्रिपटीझ

घालावे तिच्या डोळ्यात भरपूर ग्लिसरीन
हुकुमी अश्रुपातासाठी
प्रायोजित भावनातिरेकाने बिघडू न देता
चेहऱ्याची रंगरंगोटी

मागावी लाचार भीक अभिप्रायांच्या एस.एम.एस.ची
कुरवाळून दाढ्या
कंपूंच्या, जातीच्या, गावाच्या, शहराच्या, प्रदेशाच्या
वेळप्रसंगी धर्माच्याही...
अहो, मी तुमच्यातलाच
प्लीज‌, प्लीज‌, प्लीज‌, मला मत द्या
माझ्या कवितेचा दुवा आहे ******
आपल्या भ्रमकाच्या पत्ताखिडकीत हा डकवा आणि एंटर दाबा
आणि मला 'डेंजर झोन'मधून बाहेर काढा हो :(

मुग्ध आहे रात्र आणिक बोलका हुंकार आहे
दोन श्वासांचा स्वयंभू लागला गंधार आहे

आजवर होते धनी जे टोमण्यांचे, वाग्शरांचे
मस्तकी त्या अक्षतांची आज संततधार आहे

चार मंत्रांचे पठण बदले कशी दृष्टी जगाची
काल स्वैराचार ठरता आज जो शृंगार आहे

मी कशाला आज राखू कालचे शालीन अंतर ?
धर्मसंमत रोमरोमावर तुझ्या अधिकार आहे

भाव थोडे कोवळे डोळ्यातले आहेत अजुनी
थांब थोडी, त्यांसही तो कावळा शिवणार आहे

वाट रुळलेली अनादी चालुया दोघे नव्याने
या प्रवासाने जगाचा नांदता संसार आहे

Newer Posts Older Posts Home