Blogger Template by Blogcrowds.

वाहिन्या म्हणतात
दोनच गोष्टींना बाजारात उठाव आहे
सेक्स आणि मेलोड्रामा
मराठीत पहिलं बाद (आम्ही नाही हो त्यातले!)
निदान दुसरं चालवून बघावं

आज चंगच बांधला
करावा आपल्याही कवितेचा 'रियॅलिटी शो'
सारून बाजूला रोजची सामाजिक बकवास,
आत्मरत मनोविश्लेषण
आणि राजकीय उपरोध

तिलाही नाचायला लावावे
कंबर लचकवत, धपापत्या उरानिशी
अर्थाच्या फालतू वस्त्रांचा करत स्ट्रिपटीझ

घालावे तिच्या डोळ्यात भरपूर ग्लिसरीन
हुकुमी अश्रुपातासाठी
प्रायोजित भावनातिरेकाने बिघडू न देता
चेहऱ्याची रंगरंगोटी

मागावी लाचार भीक अभिप्रायांच्या एस.एम.एस.ची
कुरवाळून दाढ्या
कंपूंच्या, जातीच्या, गावाच्या, शहराच्या, प्रदेशाच्या
वेळप्रसंगी धर्माच्याही...
अहो, मी तुमच्यातलाच
प्लीज‌, प्लीज‌, प्लीज‌, मला मत द्या
माझ्या कवितेचा दुवा आहे ******
आपल्या भ्रमकाच्या पत्ताखिडकीत हा डकवा आणि एंटर दाबा
आणि मला 'डेंजर झोन'मधून बाहेर काढा हो :(

1 Comment:

Post a CommentNewer Post Older Post Home