मुग्ध आहे रात्र आणिक बोलका हुंकार आहे
दोन श्वासांचा स्वयंभू लागला गंधार आहे
आजवर होते धनी जे टोमण्यांचे, वाग्शरांचे
मस्तकी त्या अक्षतांची आज संततधार आहे
चार मंत्रांचे पठण बदले कशी दृष्टी जगाची
काल स्वैराचार ठरता आज जो शृंगार आहे
मी कशाला आज राखू कालचे शालीन अंतर ?
धर्मसंमत रोमरोमावर तुझ्या अधिकार आहे
भाव थोडे कोवळे डोळ्यातले आहेत अजुनी
थांब थोडी, त्यांसही तो कावळा शिवणार आहे
वाट रुळलेली अनादी चालुया दोघे नव्याने
या प्रवासाने जगाचा नांदता संसार आहे
Labels: गझल
2 Comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)
’चार मंत्रांचे पठण बदले कशी दृष्टी जगाची
काल स्वैराचार ठरता आज जो शृंगार आहे’
:-) हे अगदी खरं.
-विद्या.
दोन श्वासांचा स्वयंभू लागला गंधार आहे
मतला जबरदस्त जमला आहे.
पण इथे मात्र लय किंचित तुटल्यासारखी वाटते
मी कशाला आज राखू कालचे शालीन अंतर ?
धर्मसंमत रोमरोमावर तुझ्या अधिकार आहे