Blogger Template by Blogcrowds.

खिडकीशी बसून मी बाहेर बघत आहे
पाहतो आहे प्रतिबिंब माझे
काचेपलिकडून आत बघणारे
कोणते वास्तव, कोणते आभास?
की खिडकी हेच एकमेव सत्य आहे
दोन भासांमधील
वा तुरुंग दुभंगलेल्या एकलाच्या
आत्ममग्न अस्तित्वाचा
की रोव्हलिंगच्या पुस्तकातील आरसा
ज्यात मला मीच दिसतो आहे
मी - नार्सिससचा खरा वारसदार

माझ्या Window ह्या कवितेचे भाषांतर.

काय द्यावा हात हल्ली माणसांना
स्वार्थ दिसतो यात हल्ली माणसांना

राक्षसांची गरज नाही कलियुगाला
माणसे खातात हल्ली माणसांना

सहज केसाने गळा कापून जाती
सहज जमतो घात हल्ली माणसांना

पाहती दिड्‍.मूढ सारे साप-अजगर
टाकताना कात हल्ली माणसांना

पाहिजे सारेच ताबडतोब आणिक
पाहिजे फुकटात हल्ली माणसांना

भेट होते जालनावांचीच केवळ
चेहरे नसतात हल्ली माणसांना

'भृंग', देवांना नसे भवितव्य उरले
माणसे भजतात हल्ली माणसांना

कोंडलेले सांगण्याला राहिले आयुष्य कोठे ?
काळजाला पिंजण्याला राहिले आयुष्य कोठे ?

सापडाया लागलो आता कुठे माझा मला मी
जीवना, तुज शोधण्याला राहिले आयुष्य कोठे ?

वांझ शिक्षणशिंपल्य़ांची उपसली शालेय डबकी
मौक्तिकांना वेचण्याला राहिले आयुष्य कोठे ?

नाथ, नाम्या, माउली अन्‍ देहुचा नादार वाणी
शेष काही वाचण्याला राहिले आयुष्य कोठे ?

साधण्या संवाद पडला माणसांशी जन्म अपुरा
चिद्‍घनाशी बोलण्याला राहिले आयुष्य कोठे ?

Newer Posts Older Posts Home