Blogger Template by Blogcrowds.

काय द्यावा हात हल्ली माणसांना
स्वार्थ दिसतो यात हल्ली माणसांना

राक्षसांची गरज नाही कलियुगाला
माणसे खातात हल्ली माणसांना

सहज केसाने गळा कापून जाती
सहज जमतो घात हल्ली माणसांना

पाहती दिड्‍.मूढ सारे साप-अजगर
टाकताना कात हल्ली माणसांना

पाहिजे सारेच ताबडतोब आणिक
पाहिजे फुकटात हल्ली माणसांना

भेट होते जालनावांचीच केवळ
चेहरे नसतात हल्ली माणसांना

'भृंग', देवांना नसे भवितव्य उरले
माणसे भजतात हल्ली माणसांना

2 Comments:

  1. abhijit said...
    लय मजी लय भारी राव.

    भेट होते जालनावांचीच केवळ
    चेहरे नसतात हल्ली माणसांना

    हा जरा कमजोर वाटला..ह्याच आशयाचा हा शेर कसा वाटतो?

    अनुभवाने मित्र शत्रू ओळखावा
    चेहरे नसतात हल्ली माणसांना


    बाकी शेर एकापेक्षा एक सरस आहेत...

    शेवटचा शेर (मकता !) एकदम कातिल आहे. सर्वोच्च आहे.

    अभिजित
    Milind Phanse said...
    @ अभिजीत :
    अभिप्रायाबद्दल आभार.
    आपण सुचवलेला बदल चांगला आहे परंतु मला अभिप्रेत असलेला अर्थ जरा वेगळा होता. तो असा : महाजालावर(internetवर) अनेकांच्या गाठी-भेटी होतात पण त्या घेतलेल्या idची घेतलेल्या idशी भेट या स्वरूपाच्या असतात. म्हणजेच मुखवटे मुखवट्यांना भेटतात. माणूस माणसाला भेटत नाही. आजच्या २४/७ "connected" जीवनावर टिप्पणी आहे.

Post a Comment



Newer Post Older Post Home