Blogger Template by Blogcrowds.

निलाजरी, बदनाम करती पावले
तुझ्याकडे अनिवार वळती पावले

पुन्हा पुन्हा का रेष लक्ष्मण ओढतो ?
न मोहणे चुकते, न अडती पावले

परावलंबित्व काय असते वेगळे
अधू तुझ्या दारीच पडती पावले

दहा दिशा फिरण्यास होत्या मोकळ्या
तुझ्या स्मृती अडवून धरती पावले

न राहिले चंचलचरण सौदामिनी
स्थिरावली परिणीत नवती पावले

तुझ्या करांचा स्पर्श निरागस, नवथर व्हावा
न देह तेव्हा कैसा माझा कातर व्हावा ?

न मोह मजला इंद्रपुरीच्या रंभेचाही
मनात माझ्या तुझाच केवळ वावर व्हावा

कशास रागे भरसी, आहे प्रियकर मी तर
तुझ्या रुपाने बैरागीही बर्बर व्हावा

तुझे नि माझे मीलन व्हावे चांदणरात्री
सखे, न रेशिमपडद्यांचाही अडसर व्हावा

असे जगावे, मृत्यूचेही नेत्र भरावे
असे मरावे, जगण्यालाही मत्सर व्हावा

तुझ्याविना निष्फळ बागेचा मोहर व्हावा
'मिलिंद' केवळ तू सुमनाचा मधुकर व्हावा

ऋतू येत होते, ऋतू जात होते
बहरणे फुलांचे दिमाखात होते

कुणी स्पर्श केला कळीला न कळले
उमलणेच केवळ तिला ज्ञात होते

अधोमुख असे ती कधी लाजुनी अन्
कधी बाण तिरप्या कटाक्षात होते

तिच्या आठवांचे कफन पांघरुनी
किती प्रेमवेडे सती जात होते

गुन्हेगार नाही, सखे, एकटा मी
नयन तव शराबी प्रमादात होते


गजलेची जमीन वैभव जोशी ह्यांच्या सौजन्याने

Newer Posts Older Posts Home