ओरखडे होते की ह्या खुणा माणसांच्या होत्या ?
चोरखडे नजरांचे ह्या खुणा सज्जनांच्या होत्या
भक्त किती आले-गेले तयाच्या असाव्या नोंदी
मूर्तिवरी देवीच्या ज्या खुणा भंजकांच्या होत्या
नरक मिळे सहजासहजी असे का तुम्हाला वाटे ?
वागविते अंगावर ज्या खुणा वामनांच्या होत्या
देह कधी चंदन होता, सुगंधी सुखांचा ठेवा
चर्चुनिया जाणाऱ्यांच्या, खुणा भुजंगांच्या होत्या
खेळ कुणाचा, कोणाच्या असे हार सर्वस्वाची
द्यूतजितेच्या खोलावर खुणा त्या पणांच्या होत्या
तेच दिवस ऐसे जेव्हा जरासा विसावा होता
लाल शोणिताने ज्यावर खुणा तारखांच्या होत्या
यत्न किती केला तरिही कसे त्यांस मी विसरावे ?
ऐरणीवरी देहाच्या खुणा ज्या घणांच्या होत्या ?
Labels: कविता
0 Comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)