Blogger Template by Blogcrowds.

दिवे समंजस विझून जावे
तमात रुसवे ढळून जावे

वसंत यावा उधाण देही
अजाणता मोहरून जावे

शरीर कविता, नजर रुबाई
पदर, पदर उलगडून जावे

जिवंत होण्या मिठीत तुझिया
अनेक मृत्यू जगून जावे

तनामनाची पखाल केली
तहान तू भागवून जावे

रात्र ही यावी, सजावी रोज रात्री
हा जिव्हाळा, ही नव्हाळी रोज रात्री

मीलनाची चंदनी छेडून वीणा
श्वास गातो गंधगाणी रोज रात्री

ताल धरता या उरातिल स्पंदनांने
झिंगुनी लय अनुभवावी रोज रात्री

काळरात्री पाहिले जे स्वप्न आपण
पूर्तता त्याची घडावी रोज रात्री

चांदण्यांच्या मंचकी काया अशी ही
का चितेसम धडधडावी रोज रात्री

रोज मातीने नवा आकार घ्यावा
मृण्मयी जन्मास यावी रोज रात्री

स्वतःस पावसास अर्पिते
उसासते, धरा सुवासते

छ्चोर सूर्य छेड काढतो
पहाटव्योम लाजलाजते

धुक्यात लोपल्या दिशा जुन्या
नवे क्षितिज मना खुणावते

पथिक अजून थांबला कुठे
थकून वाट का विसावते

शिखर असो सुरम्य साजिरे
वसावया दरीच लागते

चढून उंच डोंगरावरी
पठार काय ध्येय साधते

निजे उशास स्वप्न घेउनी
कवेतले गुलाब उमलते

जळात मी असून कोरडा
सरस्वती उगीच वाहते

दुधाळ पौर्णिमेपरी कुणी
मिठीत चांदणी प्रकाशते

Newer Posts Older Posts Home