Blogger Template by Blogcrowds.

परीस

संधिकाल, पूर्वराग धुंद बैसलीस गात
मोहरून तेवते दिव्यादिव्यात सांजवात

केस मोकळे, शशीसमान चेहरा तशात
चंद्रबिंब लाजुनी लपेल मेघपल्लवात

भेट अल्प जाहली, सले अपूर्णता उरात
मी जगून घेतले युगांस चोरल्या क्षणात

तूच छेडलीस तान, ही तुझीच आर्त साद
सूर हेच खेळतात माझिया नसानसात

मंत्रमुग्ध ऐकतो तुझे अपूर्व यक्षगान
नर्तनास, किन्नरी, तुझ्या नसे तुला जगात

नांदतेस जाणिवांत, भारतेस नेणिवेस
तू मनातला हुरूप, पंचप्राण जीवनात

छत्र-चामरे कशास, गंधयुक्त श्वेतपुष्प
ढाळतो शिरी सदैव अंगणात पारिजात

भंगला तुला बघून, साहवे न रूप त्यास
हाय,टाकला कटाक्ष तू उगाच आरशात

काफिला जुना नको, न मैफिली, न मोहजाल
सप्तस्वर्ग निर्मिलेस, राहुटीत, काननात

मोरपीस का फिरे, कशी शहारली पहाट
घेतलास तू हळूच सोडवून गौर हात

तू परीस देवदत्त, लाभलीस पामरास
या सजीव फत्तरास आणलेस माणसात

3 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home