Blogger Template by Blogcrowds

अभिमन्यू अन्‌ आकांक्षांचे नाते आहे

दोघांसाठी अमरत्वाचे जाते आहे



भरडायाला काळाने ठेका धरला अन्‌


सटवाई तालावर ओवी गाते आहे



व्याजावर लावू बघणार्‍यांनी सांगावे


माणुसकी का बँकेमधले खाते आहे?



अपयश दैवावर मी इथवर ढकलत होतो


तेही आता संगत सोडुन जाते आहे



घाटावरुनी जिभल्या चाटत पंडित बघती


गंगेमध्ये शव कोणाचे न्हाते आहे



सांगा, नैराश्याला नावे का ठेवू मी?


ते तर माझ्या काव्याचे उद्गाते आहे

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home