Blogger Template by Blogcrowds.

कुणी पिचल्याविना आयुष्य सुखकर होत नाही 

फुले चुरगाळल्यावाचून अत्तर होत नाही 



तिचे सर्वस्व देणेही अखेरी व्यर्थ ठरते 


नदीचा लोप होतो, गोड सागर होत नाही 



तुझ्या-माझ्या असाव्या वेगळ्या व्याख्या सुखाच्या 


तुला स्पर्शूनही मन्मथ अनावर होत नाही 



नव्याने भेटुया दोघे, नव्याने प्रेम करुया 


जुन्या जखमा नव्या भेटीत अडसर होत नाही 



मनी वैराग्य नसता राख फासावी कशाला 


जटा पिंजून कोणी चंद्रशेखर होत नाही 



पुरे ही भाषणे, सत्संग, प्रवचन आणि सल्ले 


हवेच्या बुडबुड्यांची मीठ-भाकर होत नाही

बरळ

इतके कुणी कुणाच्या जावे जवळ कशाला

लगटून वार करण्या द्यावेच बळ कशाला


आयुष्य भोगण्याची संधी पुन्हा न येते

ही अर्थ शोधण्याची ढवळाढवळ कशाला


मातीत चाक रुतणे चुकते इथे कुणाला

प्रारब्ध माणसाचे ठरते अटळ कशाला



नीती म्हणून काही उरले न औषधाला

मी अन्यथा कुणावर ओकू गरळ कशाला



उल्केसमान सारे खातात रोज माती

मी एकटाच येथे राहू अढळ कशाला



कोणी म्हणोत काही, बसणार स्वस्थ आता

आकाश फाटल्यावर लावू ठिगळ कशाला



सांगेन अर्जुनाला उपयुक्त चार गोष्टी

समरी, मिलिंद, मिथ्या बोलू बरळ कशाला 

Newer Posts Older Posts Home