Blogger Template by Blogcrowds.

मिटवू तृष्णा, नंतर करुया देवा-धर्माच्या गोष्टी
पेले भिडवत करुया पावन तीर्थप्रसादाच्या गोष्टी


नटुनी-सजुनी साद घालते आहे जग, तू पहा जरा
जीवन भोगुन होण्याआधी का परलोकाच्या गोष्टी ?


कालपावेतो छेडित होती नजरेला देऊन नजर
झुकले डोळे कसे अचानक, का संकोचाच्या गोष्टी ?


तिची पापणी झुकली खाली, मला वाटले प्रेम असे
उघड्या डोळ्यांनी करतो मी स्वप्नरंजनाच्या गोष्टी


कधी तरी मनसोक्त पिऊ द्या रसाळ ओठांचे प्याले
का ’भृंगा’ला रोज सांगता मनोनिग्रहाच्या गोष्टी ?




माझ्या ह्या उर्दू गझलेचा स्वैर अनुवाद.

जरा धुंडाळले जेव्हा मनाचे कोपरे काही
किती गुंते निघाले अन्‌ स्मृतिंचे पुंजके काही

दिले होतेस स्पर्शांचे कधी रेशीम तागाने
मनी अद्याप वागवतो जुनेरी लक्तरे काही

तुझ्यावाचून जगण्याची सरावाने सवय झाली
तुझ्याजागी करी माझ्या अता प्याल्यातले काही

स्मृतींचा घेत धांडोळा उतरलो  भूतकाळी मी
दिले छद्मी समुद्राने रिकामे शिंपले काही

किती उच्चार प्रेमाचा, किती आणा, किती शपथा
मनी होते विधात्याच्या इरादे वेगळे काही

जुनी दीपावली स्मरतो, जरी काळोख वाट्याला
जशी उल्केस आठवती जुनी तारांगणे काही

पुसावे शब्द चुकलेले युगुल गीतातले सारे
पुन्हा मुखडा बघावा अन्‌ लिहावे अंतरे काही

उरी भावनांचा महापूर आहे
मिठीचा किनारा परी दूर आहे


तिचे स्पष्ट नाकारणे चालते पण
रुकारात संदिग्धसा सूर आहे


तिची वाट पाहून शिणलेत डोळे
पहा स्वप्नरंजन किती क्रूर आहे


"दिवेलागणीला तुझे नेत्र ओले ?"
नयनदीप विझले तरी धूर आहे...


मना, लाभले काय हळवेपणाने ?
फुका रक्तरंजित उभा ऊर आहे

बाग समजावून थकली, फूल कोठे ऐकते
ऊन जर भाग्यात आहे, का दवावर भाळते ?


भोगुनी दररोज दुःखे, लागले आहे व्यसन
भंगल्या हृदयास लज्जत वेदनेची भावते


मीलनाचे गूज मी सांगू कसे, लाजेल ती
एव्हढे सांगेन, धुंदी आजही रेंगाळते


पारध्याचे नाव मी ओठी जरी ना आणले
जाणतो पण कोण पडद्याआडुनी डोकावते


प्रेम केल्याने अवस्था काय हृदयाची, पहा
भग्न अवशेषात कोणी प्रेमिका का राहते ?


राहिली, 'भृंगा', कुठे दिनरातची धुंदी जुनी ?
मद्य काव्याचे न पूर्वीसारखे फेसाळते




माझ्या ह्या गजलेचा आंशिक व स्वैर अनुवाद.

Newer Posts Older Posts Home