धोक्यात आज आहे अस्तित्व कल्पनांचे
होते कधी जगावर वर्चस्व कल्पनांचे
सांगावयास सुचते जेव्हा नवे न काही
शब्दांत झाकतो मी वंध्यत्व कल्पनांचे
का शांत सर्व झाल्या तोफा धडाडणार्या?
वागीश्वरी, पुन्हा दे तू सत्त्व कल्पनांचे
वर्धिष्णु वीण आहे तलवार, बंदुकांची
वाढेल सोबतीने षंढत्व कल्पनांचे
शेळ्या बनून जाऊ मागून घोषणांच्या
येथे हवे कुणाला दायित्व कल्पनांचे?
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
पाहून वादळाला झाला पसार नाही
हा कोणता दिवा जो विझण्या तयार नाही ?
गेले अनेक श्रेष्ठी लावून दीपमाला
अंधार क्षीण होण्या काही तयार नाही !
मी का न भिरभिरावे फुलपाखराप्रमाणे ?
नाहीतरी फुलांची निष्ठा अपार नाही
किलबिल न पाखरांची, ना सावली न उंची
झुडुपास कोण सांगे, तो देवदार नाही ?
शब्दांत रंग भरतो मी भाव-भावनांचे
जीवन चितारुनीही मी चित्रकार नाही ?
कविता करीत जातो तोटा-नफा न बघता
हा मोद जीवनाचा, हा रोजगार नाही
थकतील डुंबणारे वेचून मौक्तिकांना
ह्या शब्द-सागराला पण अंत, पार नाही
धिक्कारही न झाला, नाही निषेध यंदा
शब्दांत, भृंग, उरली ती तीक्ष्ण धार नाही
Labels: Marathi ghazal, गझल, मराठी गझल
