Blogger Template by Blogcrowds.

कविता असावी एश्चरची चित्रं ,
प्रत्येक कोनातून निराळी दिसणारी
सारा नजरेचा खेळ,
जिथे गळून पडतात जड लेबलं
शक्य-अशक्य, खरं-खोटं, चूक-बरोबरची
आणि उरतो फक्त आरसा
दृष्टिकोनाचा


कविता असावी मयसभा
आभासित वास्तव व वास्तववादी आभासाची,
जिथे घसरून पडावेत
संभ्रमित, असूयाग्रस्त दुर्योधन
आणि तोंड फुटावे
पुढच्या महाभारताला


कविता असावी पडदानशीन प्रेयसी
जी लावते वेड प्रियकराला
क्षणभर दूर सारून पडदा,
मोहून घेते लावण्याच्या दुर्लभ दर्शनाने
पण राखून दोन हात अंतर
राखते मान आपल्या स्त्रीत्वाचा
दूर न लोटता


कविता असावी मॅरी अन्तुआनेट
आत्मरत, बेफिकीर, मग्रूर
"लेट देम ईट केक" म्हणणारी
सुरक्षित, अनाम जीवन नाकारून
लोकक्षोभाच्या वधस्तंभावर
इतिहासात अमर होणारी


कविता असावी अमृत-मंथन
ज्याचे त्याने करण्याचे
इथे स्थान नसे आउटसोर्सिंगला
नवनीत गाईडकडे
जे पाजेल उत्तर परीक्षार्थींना बोळ्याने
अभ्यासक्रमानुसार


कविता असावी चक्रव्यूह
परतीची वाट नसलेला
ज्यात घडावे दर्शन
एकत्र चालून येणार्‍या सहा रिपुंचे
शौर्याचे, क्रौर्याचे
असाहाय्यतेचे, स्वप्नांच्या उध्वस्त उपवनांचे
आणि नियतीच्या अटळ लेखाचे


कविता असावी प्रश्नमंजूषा
जिला सापडू नये उत्तर ’कोहम्‌’चे कधीच
अन्यथा संपेल प्रवास तिचा तिथेच
आणि कवी काढत बसतील झेरॉक्स
पूर्वसुरींचे, पूर्वाश्रमीचे...

1 Comment:

  1. HAREKRISHNAJI said...
    surekh

Post a Comment



Newer Post Older Post Home